विरूर गावात सामाजिक क्रांतीची नांदी
लग्नसराईच्या सुरुवातीलाच तीन आंतरजातीय विवाह जुळले
विरूर (स्टेशन) / अविनाश रामटेके
राजुरा तालुक्यातील विरूर गावात लग्नसराईच्या सुरुवातीलाच तीन आंतरजातीय विवाह जुळल्याने सामाजिक परिवर्तनाचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे हे विवाह दोन्ही समुदायांच्या संमतीने, रीतसर बैठक घेऊन आणि परंपरागत पद्धतीने पार पडत असल्याने समाजात समन्वय आणि समतेचा आदर्श निर्माण होत आहे.
या आंतरजातीय विवाहांमध्ये कुणबी समाजातील युवकाचा आदिवासी समाजातील युवतीशी, बौद्ध समाजातील युवकाचा कुणबी समाजातील युवतीशी, तसेच बंजारा समाजातील युवकाचा बौद्ध समाजातील युवतीशी विवाह जुळला असून येत्या काळात हे सर्व युवक-युवती विवाहबंधनात अडकणार आहेत.
पूर्वी ग्रामीण भागात जात, परंपरा आणि सामाजिक दबावामुळे अशा विवाहांना विरोध होत असे. मात्र विरूर गावात चित्र वेगळे असून, दोन्ही कुटुंबे आणि समाजघटक एकत्र येऊन चर्चा, बैठक आणि समन्वयातून निर्णय घेत आहेत, हे विशेष उल्लेखनीय आहे.
सामाजिक बदलाचे प्रतीक ठरत आहे विरूर
विरूर गाव आज जातिभेदाला छेद देणाऱ्या सामाजिक क्रांतीचे प्रतीक ठरत आहे. युवक-युवती स्वतःचा जीवनसाथी निवडताना आता जात न पाहता समज, शिक्षण, विचार आणि आपुलकीला प्राधान्य देत आहेत. ही घडामोड केवळ तीन विवाहांपुरती मर्यादित नसून, ती समाजाच्या मानसिकतेत होत असलेल्या मोठ्या बदलाची नांदी आहे. आंतरजातीय विवाहामुळे समाजात समता, बंधुता आणि सामाजिक एकात्मता वाढण्यास मदत होत असून, येणाऱ्या पिढीसाठी हा एक प्रेरणादायी संदेश ठरत आहे.
राजुरा तालुक्यातील विरूर हे गाव आज केवळ भौगोलिकदृष्ट्या नाही, तर सामाजिक विचारांनीही पुढारलेले गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे. आंतरजातीय विवाहांचा हा वाढता कल म्हणजे जातमुक्त, समताधिष्ठित समाजाकडे टाकलेले ठोस पाऊल आहे.








