पोलिस अधिकाऱ्यांकडून जातीय अत्याचार, खोटी FIR, बेकायदेशीर अटक व मारहाण – न्यायाची मागणी
वर्धा / अर्पित वाहाणे
वर्धा शहरात पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विक्की सवाई यांनी वर्धा शहर पोलिस ठाण्यातील अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत.
पीडितांच्या म्हणण्यानुसार, 18 फेब्रुवारी 2025 रोजी ते तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असता, उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार घेण्यास स्पष्ट नकार दिला. यावेळी पीडित व त्यांच्या मातोश्रींना जातिवाचक अश्लील शिवीगाळ करण्यात आली तसेच जीव घेण्याची धमकी देण्यात आली.
यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी संगनमताने पीडिताविरुद्ध खोटी FIR दाखल करून, त्यांना रात्री बेकायदेशीरपणे अटक करून लॉकअपमध्ये टाकले.
19 फेब्रुवारी 2025 रोजी चौकशीच्या नावाखाली पीडितास लॉकअपमधून बाहेर काढून निर्घृण मारहाण करण्यात आली. मोबाईलचा पासवर्ड जबरदस्तीने विचारण्यात आला, नकार दिल्यावर जातीय शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज उपलब्ध असून त्यात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे कृत्य स्पष्ट दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुख्य मागण्या : संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ FIR नोंदवण्यात यावी. SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, पीडिताविरुद्ध दाखल खोटी FIR रद्द करण्यात यावी, 18 व 19 फेब्रुवारी 2025 चे CCTV फुटेज जप्त करून सुरक्षित ठेवण्यात यावे, पीडित व त्यांच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे, तात्काळ न्याय मिळाला नाही, तर हे प्रकरण राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेऊन जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ता विक्की सवाई यांनी दिला आहे.









