Home चंद्रपूर जिद्दीची कमाल! आवाळपूरचा पुण्यदीप PSI मध्ये राज्यात तिसरा

जिद्दीची कमाल! आवाळपूरचा पुण्यदीप PSI मध्ये राज्यात तिसरा

0
123

जिद्दीची कमाल! आवाळपूरचा पुण्यदीप PSI मध्ये राज्यात तिसरा

आवाळपूर :- जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असेल तर यश दूर राहत नाही, हे आवाळपूर येथील पुण्यदीप दिपक शिलारकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकाच वेळी तीन पदे मिळवून गावाचे नाव राज्यभर उजळवले आहे.

पुण्यदीप शिलारकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण आवाळपूर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी ब्रह्मपुरी येथील शासकीय महाविद्यालयातून पॉलिटेक्निक पूर्ण केले. त्यानंतर अमरावती येथील राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी २०२० च्या सुमारास महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

अभ्यासात हुशार असलेल्या पुण्यदीपने चंद्रपूर येथे राहून २०२१ आणि २०२२ या कालावधीत स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी केली. या काळात तो पोलिस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीपर्यंत पोहोचला होता. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि वडील ठेकेदारीच्या कामातून निवृत्त झाल्यामुळे शहरात राहून अभ्यास करणे कठीण झाले. त्यामुळे पुण्यदीपने खचून न जाता स्वगावी परतण्याचा निर्णय घेतला.

गावात परतल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचनालयात बसून त्याने पुन्हा नव्या जोमाने अभ्यास सुरू ठेवला. सलग दोन वर्षांच्या अथक परिश्रमाचे फळ अखेर २०२४ या वर्षी मिळाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये त्याने तिहेरी यश संपादन करत कनिष्ठ लेखापाल (कोषागार विभाग), राज्य कर निरीक्षक आणि नुकत्याच लागलेल्या पोलिस उपनिरीक्षक या तीन पदांवर यश मिळवले. सद्या तो कनिष्ठ लेखापाल म्हणून मुबई येथे कार्यरत आहे.

विशेष म्हणजे पोलिस उपनिरीक्षक पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून तो राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. आवाळपूर गावातून राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पद मिळवणारा तो पहिलाच तरुण ठरला आहे. त्यामुळे गावासह परिसरात त्याच्या यशाचा अभिमान व्यक्त केला जात आहे.
घरची परिस्थिती बेताची असतानाही वडिलांनी दिलेला पाठिंबा, आई, ताईचे आशीर्वाद आणि कुटुंबीयांची साथ यामुळेच हे यश शक्य झाल्याचे पुण्यदीपने सांगितले. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई-वडील, ताई आणि मित्रपरिवाराला दिले आहे.

पुण्यदीप शिलारकर यांच्या यशामुळे आवाळपूर गावात आनंदाचे वातावरण असून तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. जिद्द आणि चिकाटी असेल तर आकाशही ठेंगणं पडते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!