महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन कार्य करावे – अर्चना भोंगळे
विश्वमांगल्य सभा ; १६ व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर येथे हळदीकुंकू कार्यक्रम
राजुरा : महिलांनी स्पर्धेच्या युगात केवळ घरापुरते मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊन कार्य करणे आज काळाची गरज आहे. आपल्याकडे कर्तृत्व आणि संयम या दोन्ही गोष्टी आहेत, फक्त आत्मविश्वासाने पहिले पाऊल टाकणे गरजेचे आहे. मग ते राजकारण असो, समाजकारण असो वा उद्योग, महिलांनी आपले स्थान स्वतः निर्माण केले पाहिजे. विश्वमांगल्य सभेसारख्या व्यासपीठामुळे महिलांना ही शक्ती आणि दिशा मिळत आहे. आपण संघटित झालो तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच आजच्या या सोहळ्यावरून सिद्ध होते. प्रत्येक भगिनीने स्वतःमधील सुप्त गुणांना ओळखून भरारी घ्यावी,असे प्रतिपादन सौ अर्चना देवराव भोंगळे यांनी केले.
चंद्रपूर येथे विश्वमांगल्य सभेच्या १६ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्याने काल ( दि.२७) हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी सौ.भोंगळे बोलत होत्या.
पुढे बोलतांना सौ.अर्चना भोंगळे म्हणाल्या की, हळदी-कुंकू सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून महिलांच्या एकजुटीचे प्रतीक आहे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, अशा वेळी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे. या व्यासपीठामुळे महिलांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळते. अशा उपक्रमांमुळेच समाजात स्त्रीशक्तीचा जागर होतो. महिलांमध्ये उपजतच नेतृत्वगुण असतात, फक्त त्याला योग्य वाव मिळणे आवश्यक असते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच आपण समाजाप्रती असलेले आपले ऋण विसरता कामा नये. विश्वमांगल्य सभेच्या माध्यमातून आपण जी एकजूट दाखवली आहे, तीच आपली खरी ताकद आहे.असेही सौ. भोंगळे यांनी सांगितले.
याप्रसंगी आम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुविद्य पत्नी सौ. सपनावहीनी मुनगंटीवार, चंशमनपा च्या महापौर संगीता खांडेकर, आमदार संजय पुराम यांच्या सुविद्य पत्नी सौ. सविता पुराम, प्रदेश महिला मोर्चाच्या महामंत्री कु. अल्काताई आत्राम, माजी जि.प.अध्यक्षा संध्या गुरनुले, पोंभुर्णा येथील नगराध्यक्षा सुलभा पिपरे, गोंडपिपरी येथील नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, वंदना शेंडे,सविता कांबळे, विजया डोहे, सुलभा पिपरे,विद्या देवाळकर किरण बोढे, लक्ष्मी सागर, रेणुका दुधे यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








