Home चंद्रपूर नोंदणीकृत कापुस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ; १५ मार्चपर्यंत कापूस खरेदीला मुदतवाढ!

नोंदणीकृत कापुस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ; १५ मार्चपर्यंत कापूस खरेदीला मुदतवाढ!

0
120

नोंदणीकृत कापुस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ; १५ मार्चपर्यंत कापूस खरेदीला मुदतवाढ!

आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश…

राजुरा, दि. २८
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी धावून येत आमदार देवराव भोंगळे यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे भारतीय कापूस निगम (CCI) कडून कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, परंतु अद्याप कापूस विक्री शिल्लक आहे, अशा हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार भोंगळे यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

दि. १६ जानेवारी पासून कापूस खरेदीसाठी नोंदणीची मुदत संपत आल्याने आणि अनेक शेतकऱ्यांचा माल अद्याप घरातच असल्याने शेतकरी चिंतेत होता. कापूस पडून राहिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची भीती निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार देवराव भोंगळे यांनी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आणि पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल यांच्याकडे तसेच सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांकडे असलेल्या कापसाची उपलब्धता आणि तांत्रिक अडचणींमुळे झालेला विलंब लक्षात घेता मुदत वाढवून देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आज विधिमंडळ अधिवेशनात सभागृहात बोलतांना पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल यांनी सीसीआयकडून आता १५ मार्चपर्यंत कापूस खरेदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या मुदतवाढीचा लाभ घेण्याचे आवाहन करताना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, शेतकऱ्यांचा एकही कापूस बोंड घरात राहू नये आणि त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, हाच आमचा उद्देश आहे. शासनाने मुदत वाढवून दिल्याने आता शेतकऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता आपला नोंदणीकृत कापूस तातडीने सीसीआय केंद्रावर विक्रीसाठी घेऊन जावे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मुदतीपूर्वी आपला कापूस शासकीय केंद्रावर विकून हमीभावाचा फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
या निर्णयामुळे कापूस उत्पादक पट्ट्यात आनंदाचे वातावरण असून शेतकऱ्यांनी आमदारांच्या तत्परतेबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!