चामोर्शी हरणघाट रस्त्याची दुरावस्था नागरिकांच्या नशिबी; वारंवार आंदोलन, निवेदने व्यर्थ — PWD चामोर्शीचे कान झाकलेच!
रस्ता कोसळतोय, वाहनं मोडतात… पण PWD चामोर्शी दुरुस्तीच्या नावाखाली फक्त आश्वासनं
शेकडो तक्रारी, रस्ता रोको, निवेदने… तरीही PWD ला जाग येईना!”
चामोर्शी:सुखसागर झाडे
चामोर्शी | हरणघाट मार्गाची दयनीय अवस्था दिवसेंदिवस भीषण होत असून, या रस्त्यावरील खड्डे आता वाहनधारक आणि प्रवाशांसाठी जीवघेणा सापळा ठरत आहेत. नागरिकांनी वारंवार बातम्या, निवेदने, रस्ता रोको आंदोलन, धरने अशा असंख्य मार्गांनी आवाज उठवला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) चामोर्शी मात्र कानावर हात ठेवून शांत असल्याची सर्वत्रच चर्चा आहे.
गेल्या काही महिन्यांत रस्त्यावर खड्ड्यांचा अक्षरशः महासागर तयार झाला आहे. दोनचाकी वाहनं कोसळून जखमी होण्याचे अनेक प्रकार घडले तरीही दुरुस्तीचा एकही ठोस उपाय PWD कडून दिसून येत नाही. नागरिकांचा आरोप आहे की —
“हजार वेळा तक्रारी करूनही अभियंता फक्त आश्वासनं देतात, काम मात्र शून्य!”
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरील खड्डे इतके खोल आहेत की पावसाळा नसतानाही त्यात पाणी साचते. वाहने मोडून पडत आहेत, रुग्णवाहिका उशीराने पोहोचतात, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले आहे. अनेकदा जीव धोक्यात घालून लोक या रस्त्यावरून प्रवास करतात.
याबाबत संतप्त नागरिकांनी पुन्हा इशारा दिला आहे —
“जर PWD ने यावेळीही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले तर पुढचे आंदोलन अधिक तीव्र आणि मोठे असेल. प्रशासन जबाबदार राहणार
या सर्व घडामोडींमुळे PWD च्या निष्क्रियतेवर सर्वत्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हरणघाट रस्त्याचे काम नेमके कुठे अडले आहे? दुरुस्ती कोणी रोखून ठेवली आहे? बजेट असूनही काम का होत नाही? हे प्रश्न जनतेला सतावत आहेत.
नागरिकांची एकच मागणी —
“रस्ता द्या… आमचे जीव अडकवू नका!” अशी प्रशासनाला नागरीकांची आर्त हाक आहे.








