लोखंडी पुल दुरुस्त करून वाहतुकीसाठी तत्काळ सुरू करण्याची तसेच पर्यायी मार्ग तयार करण्याची मागणी
१५ दिवसात आश्वासन पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
घुग्घुस न्यू रेल्वे साइडिंग परिसरातील लोखंडी पुल हा नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा मुख्य मार्ग असून घुग्घुस शहरासह परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार व व्यापाऱ्यांसाठी तो जीवनरेखा ठरला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा पुल बंद असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
माहितीनुसार, मध्य रेल्वे बल्लारशाह येथील सहाय्यक विभागीय अभियंता सुबोध कुमार यांनी २९ मे २०२४ रोजी दुपारी १२ वाजता हा पुल असुरक्षित घोषित करून बंद केला होता. त्यानंतर नागरिकांना दूरचा फेरा मारून इतर मार्गाने प्रवास करावा लागत असून, त्यामुळे वेळ, इंधन व श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुल बंद असल्यामुळे काहीजण विवश होऊन जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅक ओलांडतात. कोणी ट्रेनखालून तर कोणी वरून जात असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता कायम आहे. हा पुल सुरक्षेच्या दृष्टीनेच बांधण्यात आला होता, मात्र आज तोच बंद असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
या पार्श्वभूमीवर उमेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली घुग्घुसवासीयांनी घुग्घुस उपक्षेत्रीय व्यवस्थापक मनीष पोडे यांना निवेदन देऊन लोखंडी पुलाची दुरुस्ती तत्काळ सुरू करण्याची व तोपर्यंत पर्यायी मार्ग तयार करण्याची मागणी केली. निवेदन प्राप्त झाल्यानंतर मनीष पोडे यांनी १५ दिवसांच्या आत पुल दुरुस्ती व पर्यायी मार्गाच्या कामास प्रारंभ करण्याचे आश्वासन दिले होते.
काही काळ पुल दुरुस्तीचे काम सुरू झाले होते, मात्र नंतर ते अर्धवट सोडून दिले गेले. सध्या काम पूर्णपणे ठप्प असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. उमेश गुप्ता व घुग्घुसवासीयांनी इशारा दिला आहे की, जर वेंकोली प्रशासनाने दिलेल्या १५ दिवसांच्या आश्वासनानंतरही दुरुस्तीचे काम व पर्यायी मार्गाचे काम सुरू झाले नाही, तर ते नागरिक, जनप्रतिनिधी व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडतील. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी वेंकोली प्रशासनाची असेल.
उमेश गुप्ता यांनी सांगितले की, हा पुल परिसरातील हजारो लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. वेंकोली प्रशासनाने जनहिताला प्राधान्य देत तात्काळ कारवाई करून पुल दुरुस्ती व वाहतुकीसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून द्याव्यात.








