मंत्री बावनकुळे यांचा जनसंवाद न करता काढला पळता पाय– आम आदमी पक्षाचा कडून निषेध
चंद्रपूर, २० सप्टे. :- आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागरिकांशी जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील शेकडो नागरिक मोठ्या अपेक्षेने हजर झाले होते, जेणेकरून आपल्या समस्या थेट मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवता येतील.
परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या ऐकण्याऐवजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत सोहळा, पुष्पगुच्छ देणे, शाल देणे, बिदागरी करण्याचा कार्यक्रम पार पडला. एकाही नागरिकाला आपली समस्या मांडण्याची संधी न देता मंत्री महोदयांनी तातडीने निघून गेल्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या.
आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत म्हटले –
“हा प्रकार म्हणजे जनतेची सरळसरळ दिशाभूल आहे. जनसंवाद कार्यक्रम असेल तर तो फक्त नागरिकांसाठी असावा, त्यात राजकीय पक्षाचा सत्कार सोहळा होऊ नये. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देखील स्पष्ट सूचना करतो की पुढे अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित होऊ नयेत. जर पुढील वेळी असे झाले तर आम आदमी पार्टी या कार्यक्रमांना बसू देणार नाही व ते उधळून लावतील.”
AAP ने मांडलेल्या ठोस मागण्या
आज आम आदमी पक्षाने दोन महत्त्वाची निवेदने महसूल मंत्री यांना देण्यासाठी आणली होती, ज्यामध्ये खालील विषयांचा समावेश होता.
१) ब्ल्यू लाईन व रेड लाईन हटवून नागरिकांना बांधकाम परवानगी द्या
चंद्रपूर शहरातील वडगाव, नगीना बाग, राष्ट्रवादी नगर, तुळशी नगर, रहमत नगर, सिस्टर कॉलनी या परिसरात ४० ते ५० हजार नागरिकांना घर बांधण्यास परवानगी मिळत नाही.
जलसंपदा विभागाने आखलेल्या ब्ल्यू लाईन व रेड लाईनमुळे नागरिकांना बांधकामावर बंदी आहे.
2020-21 मध्ये झालेला ड्रोन सर्वे चुकीच्या आधारावर झाला, फक्त रामसेतू पुलाची उंची वाढवण्यासाठी कृत्रिमरीत्या पूररेषा दाखवण्यात आल्या.
वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या अनेक वर्षांत या भागात इतक्या उंचीपर्यंत पूर कधीच आलेला नाही.
महानगरपालिकेमार्फत रस्ते, नाले व विकासकामे होत असूनही नागरिकांना घरकुल परवानगी नाही हा सरळसरळ अन्याय आहे.
म्हणून ब्ल्यू लाईन व रेड लाईनचे तात्काळ पुनर्मूल्यांकन करून त्या रद्द कराव्यात आणि नागरिकांना बांधकाम परवानगी द्यावी.
२) भूमीहीन व भाडेकरू नागरिकांना मोफत जागा द्या
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भूमीहीन, भाडेकरू कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे स्वतःची घरकुलाची जागा नाही.
शासनाकडे उपलब्ध वनजमीन, महसूल जमीन, नझुल जमीन ओळखून लेआउट तयार करावा व त्या जागा मोफत किंवा अत्यल्प दरात या कुटुंबांना द्याव्यात.
सर्वेक्षण मोहीम राबवून यादी तयार करावी व यासाठी विशेष शासन निर्णय (GR) काढावा.
AAP पदाधिकारी उपस्थित
या वेळी आम आदमी पक्षाचे प्रदेश जॉइंट सेक्रेटरी सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजीव कुंडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, संगठन मंत्री संतोष बोपचे, महिला शहर अध्यक्षा ऍड. तबस्सुम शेख, जिल्हा सचिव राजकुमार नागराळे, महानगर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हांडेकर गुरुजी, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक बेरशेट्टीवार, विशाल बिरमवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की सरकारने नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी खरोखर जनसंवाद साधला पाहिजे, अन्यथा अशा दिखाऊ कार्यक्रमांचा तीव्र विरोध करण्यात येईल.








