महसूल सप्ताह जनता व प्रशासन यांच्यातील विश्वास दृढ करणारा उपक्रम
तहसीलदार पल्लवी आखरे : कोरपणा येथे महसूल दिन उत्साहात साजरा
कोरपणा : १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जात असताना यावर्षी एक आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमामुळे या आठवड्याला महसूल सप्ताह म्ह्णून साजरा केला जात आहे. यावेळी तहसीलदार पल्लवी आखरे यांनी एक आठवडा चालणाऱ्या या सप्ताहच्या माध्यमातून जनतेच्या समस्या महसूल व जनतेच्या माध्यमातून वर्षभर सोडविण्याचा निश्चय बांधण्याचे सांगितले, महसूल सप्ताह हा फक्त औपचारिक कार्यक्रम नसून, जनतेच्या थेट सहभागातून प्रशासन व नागरीक यांच्यातील विश्वास दृढ करणारा उपक्रम असल्याचे सांगितले.
यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान, तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांतील प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या महसूल सप्ताहामध्ये २ ऑगस्ट रोजी अतिक्रमण नियमन प्रक्रियेस पात्र कुटुंबांना पट्टे वितरण व आढावा बैठक, उपविभागीय कार्यालय राजुरा येथे आयोजित केली आहे. ३ ऑगस्ट रोजी गावांमध्ये पांदन रस्त्यांचे नियोजन व दुर्तफा वृक्षलागवड मोहिम, ४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान मंडळ गावांमध्ये राबविण्यात येणार. ५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन व मॅपिंगसाठी घरभेट मोहीम, आणि पंचनामे करण्यात येणार. ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण व शर्तभंग प्रकरणांचे निराकरण, दोषींवर कारवाई. ७ ऑगस्ट रोजी M-Sand धोरणाची अंमलबजावणी, नविन एस.ओ.पी. अनुसार कार्यप्रणाली पूर्ण करणे व महसूल सप्ताहाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








