अकोला बाजारच्या तरुणांचा सामाजिक वारसा ; मुख्य रस्त्यावरील झाडांना पाणी देऊन जपली पर्यावरण बांधिलकी
वर्धा / अर्पित वाहाणे
अकोला बाजार वाढत्या उन्हाची तीव्रता आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्व ओळखून, अकोला बाजार येथील SBV BOYS नवयुवक मंडळाच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. गावातील मुख्य रस्त्यावरील झाडांना पाणी देऊन त्यांचे जतन करण्याची जबाबदारी या तरुण मंडळाने उचलली आहे.
वृक्ष जतन हीच काळाची गरज
अनेकदा वृक्षारोपण केले जाते, परंतु देखभालीअभावी झाडे सुकून जातात. हे टाळण्यासाठी ‘संकल्पना ते प्रत्यक्ष कृती’ असा प्रवास या तरुणांनी सुरू केला आहे.सम्यक घुले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे गावातील मुख्य रस्ता आता हिरवागार राहण्यास मदत होणार आहे.या मोहिमेत अकाश गूढे, यश बनसोड, रोनक मेश्राम, लकी मेश्राम, विनीत नरांजे, सोहम शेंद्रे, अनुराग भगत आणि कारुण्य वाघमारे अश्या अनेक तरुणांनी एकत्र येत श्रमदान केले. उन्हाची तमा न बाळगता आठवडयातील एक दिवस झाडांना पाणी देण्याचा निर्धार या टीमने केला आहे.
केवळ सण-उत्सव साजरे न करता, सामाजिक जाणीवेतून पर्यावरणासाठी धावून येणाऱ्या SBV BOYS च्या या कार्याचे अकोला बाजार परिसरात विशेष कौतुक होत आहे. इतर मंडळांनीही अशाच प्रकारे निसर्गाच्या रक्षणासाठी पुढे यावे, असा संदेश या निमित्ताने दिला जात आहे.
‘झाडे फक्त लावून चालत नाही, तर ती पोटच्या गोळ्याप्रमाणे जगवावी लागतात. आमच्या टीमचा हा छोटासा प्रयत्न गावाच्या सौंदर्यात आणि पर्यावरणात नक्कीच भर घालेल.’ अशी प्रतिक्रिया SBV BOYS नवयुवक मंडळ तर्फे यावेळी देण्यात आली.









