9 वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ समोर केले आत्मसमर्पण
गडचिरोली, सुखसागर झाडे :- जिल्ह्यातील नक्षलविरोधी कारवायांना मोठे यश मिळाले असून 03 एसीएम (Area Committee Member) पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह इतर 06 अशा एकूण 09 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ समोर स्वेच्छेने आत्मसमर्पण केले आहे.
महाराष्ट्र शासनाने या सर्व माओवाद्यांवर एकत्रितपणे 30 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणावेळी दोन माओवाद्यांनी एक स्वयंचलित AK-47 रायफल व एक कार्बाईन शस्त्रांसह आत्मसमर्पण केले.
गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ यांच्या संयुक्त आणि सातत्यपूर्ण कारवायांमुळे सन 2025 पासून आतापर्यंत एकूण 132 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जनजागृती, विकासात्मक उपक्रम आणि पुनर्वसन धोरणांमुळे माओवाद्यांचा मुख्य प्रवाहाकडे कल वाढताना दिसून येत आहे.
तसेच, आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्तीसगड राज्यातून अग्निशस्त्रांसह इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला असून सुरक्षा दलांच्या कार्याला महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने आत्मसमर्पित माओवाद्यांचे शासनाच्या पुनर्वसन धोरणांतर्गत पुढील प्रक्रिया सुरू केली असून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येणार आहे.









