लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन तर्फे मुरसा येथे पूर्व मान्सून खरीप शेतकरी मेळाव्याचे उदघाट्न…
घुग्घुस : लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन घुग्घुस अंतर्गत येणाऱ्या शेतकरी प्रशिक्षण केंद्र मुरसा येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आज दि. १९ ते २२ मे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथे, “पूर्व खरीप शेतकरी मेळाव्याचे” दिनांक १९ मे रोजी उदघाट्न करण्यात आले आहे. या मेळाव्याला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, शासकीय योजना, महिला बचत गट आणि खरीप हंगामासाठी आवश्यक नियोजन याविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शंकर तोटावार साहेब उपस्थित होते, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रपूर श्री. गजानंद पवार साहेब व तालुका कृषी अधिकारी श्री अनिकेत माने, श्री. दिलीप पांगुल क्षेत्रीय व्यवस्थापक जैन इरिगेशन, कार्यक्रमाचे उद्घाटक लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड चे युनिट हेड श्री. वाय. जी. एस. प्रसाद सर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ट उपाध्यक्ष प्रशांत पुरी सर व लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन च्या सहाय्यक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल यांच्यासह लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचे कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर श्री. शंकर तोटावार साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात उत्पादन वाढीसाठी अष्टसूत्री तंत्रज्ञान राबवण्या विषयी शेतकऱ्यांना सखोल ज्ञान देण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांची निवड, जमिनीची तपासणी, सेंद्रिय खतांचा वापर, कीड व रोग व्यवस्थापन तसेच पाण्याचे योग्य नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर भाष्य केले. कमी पावसाच्या परिस्थितीत कोणती पिके घ्यावीत, ठिबक सिंचन आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब कसा करावा, याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक शेती पद्धतींचा स्वीकार करून शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर बनण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. वाय. जी. एस. प्रसाद सर यांनी आपल्या मनोगतात लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी कंपनी कटिबद्ध असून भविष्यातही अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी सर यांनी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादनक्षम शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले.
पूर्व खरीप शेतकरी मेळावा मध्ये पुढील ३ दिवस विविध विषयावर आधारित चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, या मध्ये कापूस पिकातील घन पद्धतीने लागवड, आंतरपीक लागवड, तूर लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक तसेच तुषार सिंचन पीक निहान व्यवस्थापन, जनावरांतील चार तसेच उन्हाळ्यात घेण्यात येणारी काळजी व व्यवस्थापन, कृषी शेती अवजारे तसेच बीज प्रक्रिया या विषयावर चर्चा सत्र घेण्यात येणार आहे. तसेच जैन इरिगेशन यांचे ठिबक सिंचनाचे व उपरे ऍग्रो इंटरप्रिंसेस, चंद्रपूर यांचे औजारे चे प्रत्यक्ष कार्यक्रमाचे सूत्र संचालन शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथील डॉ. आदित्य कदम यांनी केले तसेच प्रस्थापना सहाय्यक महाप्रबंधक डॉ. विद्यापाल यांनी केले, शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायांकडे वळण्याचा सल्ला दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली तसेच शेतीविषयक माहितीपत्रके वितरित करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी विविध कृषी विषयांवर चर्चा करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लॉईड्स इन्फिनाइट फाउंडेशन घुग्घुस यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







