Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’चा अलर्ट; प्रशासन सतर्क दुपारी क्लासेस बंद, कामगारांना विश्रांती,...

चंद्रपूर जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’चा अलर्ट; प्रशासन सतर्क दुपारी क्लासेस बंद, कामगारांना विश्रांती, रुग्णालयांना विशेष तयारीचे आदेश

0
354

चंद्रपूर जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’चा अलर्ट; प्रशासन सतर्क
दुपारी क्लासेस बंद, कामगारांना विश्रांती, रुग्णालयांना विशेष तयारीचे आदेश

चंद्रपूर : विदर्भासह चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असून नागरिक अक्षरशः उकाड्याने हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अखेर कठोर पावले उचलत ‘हीट वेव्ह अलर्ट’ जारी केला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष वसुमना पंत यांनी यासंदर्भात विशेष आदेश काढून सर्व विभागांना तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार दुपारी ११ ते सायंकाळी ४.३० या वेळेत कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळा-महाविद्यालयांना परीक्षा व वर्ग सकाळच्या सत्रात घेण्यास सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी थंड पाणी, ORS आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
उद्योग, कारखाने, खाणी आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत असल्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत विश्रांती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. उघड्यावर काम करणाऱ्या मजुरांसाठी सावली, थंड पाणी आणि ORS ची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना ‘हीट स्ट्रोक’ रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयांमध्ये IV, ORS, औषधे आणि कूलिंग सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून आरोग्य विभागाला सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
ग्रामसभा, धार्मिक कार्यक्रम आणि सार्वजनिक ठिकाणी ‘Cooling Areas’ उभारण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हा आदेश १५ जून २०२६ पर्यंत लागू राहणार असून सर्व संबंधित विभागांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून आगामी काही दिवस नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!