जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्याचे हरवलेलं स्वप्नं, शैक्षणिक वैभव पुन्हा मिळेल का..?
नवोदय विद्यालय घोटमध्ये प्रवेशाचा सावता गोंधळ; विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार, ११ पालकांची उच्च न्यायालयात याचिका
चामोर्शी, सुखसागर झाडे :- जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथील इयत्ता सहावी प्रवेश प्रक्रियेत ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, अखेर ११ पालकांना न्यायासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घ्यावी लागली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या रिट पिटीशन क्रमांक ४१२२/२०२६ वर ११ मे रोजी सुनावणी झाली असून, अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याची माहिती पालकांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेश परीक्षेचा निकाल १७ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर ६ व ९ एप्रिल रोजी प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह विद्यालयात बोलावण्यात आले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी राजू जोंधळे यांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवर्ग “अर्बन” असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, त्यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या ममता लांजेवार या कार्यालयात उपस्थित नव्हत्या.
दरम्यान, २ मे रोजी पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती घेण्यासाठी विद्यालयात भेट दिली असता त्यांना प्राचार्यांना घरी भेटण्यास सांगण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला. घरी भेट दिल्यानंतर “घरी का आलात?” अशी नाराजी व्यक्त करत पुन्हा शाळेत येण्यास सांगण्यात आले. मात्र, कार्यालयात दोन तास प्रतीक्षा करूनही प्राचार्या न आल्याने संतप्त पालकांनी ६ मे रोजी माहिती अधिकारांतर्गत अतिशीघ्र माहिती मागणीचा अर्ज दाखल केला.
तथापि, प्रवेशाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती न मिळाल्याने पालकांनी पत्रकार व लोकप्रतिनिधींना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर ८ मे रोजी सर्व पालक विद्यालयात लेखी खुलासा मागण्यासाठी गेले असता प्राचार्या अनुपस्थित होत्या. प्रभारी प्राचार्यांच्या सूचनेनुसार परीक्षा प्रभारी व कार्यालय अधीक्षकांची भेट घेतली असता, संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळा “यू-डायस” पोर्टलवर “अर्बन” दाखवत असल्यामुळे प्रवेश देता येणार नसल्याचे सांगण्यात आले.
मात्र, पालकांचा दावा याच्या नेमका उलट आहे. नवोदय विद्यालय समितीच्या निकाल यादीत विद्यार्थ्यांचा प्रवर्ग “रुरल” नमूद करण्यात आला आहे. तसेच तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांनी ७, १० आणि १३ एप्रिल रोजी दिलेल्या प्रमाणपत्रांमध्ये संबंधित परिसर ग्रामीण असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. असे असतानाही प्रवेश प्रक्रियेत जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना बोलावून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या ११ पालकांनी अखेर उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात धाव घेतली. प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने संबंधित विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्याचे निर्देश दिल्याचे पालकांनी सांगितले.
दरम्यान, ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या नवोदय विद्यालयाच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याऐवजी प्रशासनाच्या भूमिकेमुळे पालक आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
पालकांच्या आरोपानुसार, प्राचार्या ममता लांजेवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून विद्यालयात विविध वाद निर्माण झाले आहेत. काही व्यक्तींना अनुभव प्रमाणपत्र देणे, विद्यार्थ्यांशी कठोर वर्तन करणे यासारख्या तक्रारी पुढे आल्या असून, गेल्या अनेक वर्षांपासून शंभर टक्के निकालाची परंपरा असलेल्या विद्यालयाचा निकालही त्यांच्या कार्यकाळात घसरल्याचा आरोप करण्यात आला आहे. विज्ञान विषयात दोन तर गणित विषयात एका विद्यार्थ्याला अपयश आल्याचे पालकांनी निदर्शनास आणले.
“यू-डायसवर अर्बन नोंद असल्याने प्रक्रिया थांबवली” — प्राचार्या
या संदर्भात प्राचार्या ममता लांजेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “यू-डायस पोर्टलवर संबंधित विद्यार्थ्यांची नोंद ‘अर्बन’ असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. ही माहिती मुख्यालयाला पाठविण्यात आली असून न्यायालय व मुख्यालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. मी सध्या ट्रेनिंगसाठी मुख्यालयाबाहेर आहे.”
या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी वैयक्तिक लक्ष घालून अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे हरवलेले शैक्षणिक वैभव पुन्हा मिळवून द्यावे, अशी मागणी पालक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.









