Home गडचिरोली महिला व बाल रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

महिला व बाल रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

0
15

महिला व बाल रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

प्रशासनाच्या ढिसाळ निष्काळजीपणामुळे निष्पाप नवजात बालकाचा मृत्यू

 

 

दीड तास वीज गुल, इन्व्हर्टरही निकामी; व्हेंटिलेटर बंद पडून माझ्या बाळाचा श्वास थांबला. डॉक्टर म्हणाले — ‘मला नाही, व्यवस्थापनाला विचारा!’” — संतप्त वडील संदीप कुमरे

गडचिरोली, सुखसागर झाडे :- जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर बॅकअप यंत्रणाही निकामी ठरल्याने व्हेंटिलेटर बंद पडले आणि उपचाराअभावी एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील भोंगळ कारभार, निष्काळजीपणा आणि ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील संजना संदीप कुमरे (वय २३) यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याने ११ मे रोजी गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी सुमारे दोन वाजता त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, काही तासांतच बाळाची प्रकृती चिंताजनकरीत्या खालावली.
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास डॉक्टरांनी बाळाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत तातडीने चंद्रपूर येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र जिल्हा मुख्यालयातील रुग्णालय असूनही वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. पालकांनी ‘१०८’ आपत्कालीन सेवेशी संपर्क साधला असता, “रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी किमान दोन तास लागतील,” असे सांगण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
रुग्णवाहिका न मिळाल्याने नातेवाईकांची धावपळ सुरू असतानाच अखेर बाळाला रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) दाखल करण्यात आले. मात्र याच दरम्यान रुग्णालयातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल दीड तास वीज नसतानाही बॅकअपसाठी असलेले इन्व्हर्टर आणि पर्यायी यंत्रणाही बंद पडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परिणामी व्हेंटिलेटर बंद पडले आणि ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप कुमरे कुटुंबीयांनी केला आहे. “जर वेळेवर वीज आणि रुग्णवाहिका मिळाली असती, तर आमच्या बाळाचा जीव वाचला असता,” असा आक्रोश कुटुंबीयांनी व्यक्त केला.
दरम्यान, या गंभीर आरोपांवर प्रतिक्रिया देताना रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. प्रशांत पेंदाम यांनी उपचारात कोणतीही हलगर्जी झाल्याचे नाकारले आहे.

“बाळाचा जन्म मुदतपूर्व झाला होता. त्याचे वजन कमी होते आणि प्रकृती अत्यंत नाजूक होती. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, “जिल्हा रुग्णालयातच जर वीज आणि व्हेंटिलेटरची हमी नसेल, तर सामान्य नागरिकांनी जीव कोणाच्या भरोशावर द्यायचा?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्याची भावना व्यक्त होत असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!