बनावट खोट्या स्वाक्षऱ्या करून ग्रामसभा, विरूर ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रताप ; ग्रामस्थांची चौकशीची मागणी

विरूर स्टेशन/राजुरा. :- राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील ग्रामपंचायतने ग्रामसभेचे आयोजन केल्यानंतर सदर ग्रामसभेला ३० ते ३५ ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र प्रत्यक्षात ग्रामसभेला कोरम पूर्ण करण्यासाठी १२५ च्या वर खोट्या बनावट सह्या मारून कोरम पूर्ण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बनावट स्वाक्षऱ्या वापरून ग्रामसभा घेणे हा गंभीर फसवणुकीचा (भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४) गुन्हा आहे. अशी ग्रामसभा अवैध ठरवून बनावट कागदपत्रे, बनावट स्वाक्षरी करून चुकीचे ठराव पास केल्यास सबंधित सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर कारवाई कारवाई केली जाऊ शकते, निलंबन केले जाऊ शकते.
विरूर स्टेशन येथील ग्रामस्थांनी बोगस ग्राम सभे विरुद्ध संवर्ग विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे फोटो, व्हिडिओ सह तक्रार केली असल्याची माहिती आहे. या गंभीर बाबीची विरूर पोलीस स्टेशन येथे ग्रामस्थांकडून तक्रार देण्यात आली आहे.
१३ फेब्रुवारी रोजी ग्रामसभा घेण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये उपस्थित ३० ते ३५ लोक असून सदर ग्रामसभेत जे व्यक्ती उपस्थित नाही त्यांची सुद्धा नावे लिहून स्वाक्षरी केलेली आहे, असा आरोप तक्रार कर्त्यांनी केला आहे. कोरम पूर्ण करून सभा घेतलेली आहे. या सभेमध्ये १० विषय घेण्याचे नोटीस सुद्धा काढण्यात आले होते. परंतु सरपंच व काही राजकीय नेत्यांनी साठ-गाठ करून चुकीच्या मार्गाने तात्काळ निर्णय घेऊन दुसराच ठराव पारित केल्याची माहिती तक्रार कर्त्यानी दिली आहे.
ग्रामसभेमध्ये घडलेल्या घटनेची माहिती त्याच दिवशी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती आहे. तक्रारकर्त्यांनी आमच्या विरुद्ध पोलिसात खोटी तक्रार केल्याची नोंद तक्रारीत केली आहे. या गंभीर प्रक्रारावर वरिष्ठ स्तरावरून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे विरुर वासियांसह परिसरातील सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ग्रामविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.








