लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशन तर्फे महिलांसाठी कायदा जागरूकता सत्र – ‘कायद्याचे ज्ञान – महिलांचे संरक्षण’
चंद्रपूर : महिलांमध्ये कायदेशीर अधिकाराची जाणीव वाढवून त्यांना सशक्त बनविण्याच्या उद्देशाने लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशन तर्फे प्रियदर्शिनी शाळा, घुग्घुस येथे कायदा जागरूकता सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रामध्ये परिसरातील वढा, नकोडा उसगाव, पांढरकवडा, शेणगाव आणि म्हातारदेवी या गावांमधील सुमारे १५० महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
या सत्राचे मार्गदर्शन अॅड. प्रितीशा साहा यांनी केले. त्यांनी महिलांना दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त अशा झिरो एफआयआर, ऑनलाईन एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया, तसेच महिला संरक्षण आणि घरगुती हिंसाचार कायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी वास्तव जीवनातील काही गुन्हेगारी घटनांची उदाहरणे देऊन महिलांना जागरूक राहण्याचा, तसेच अशा प्रसंगी योग्य कायदेशीर पावले उचलण्याचा सल्ला दिला.
अॅड. प्रितीशा साहा यांनी महिलांना सांगितले की, प्रत्येक महिलेला स्वतःचे हक्क आणि कायदेशीर संरक्षण यांची जाण असणे अत्यावश्यक आहे. अनेक वेळा अज्ञानामुळे महिला अन्याय सहन करतात, परंतु कायद्याचे योग्य ज्ञान असल्यास त्या स्वतःसाठी आणि समाजासाठी मोठा बदल घडवू शकतात.
कार्यक्रमास लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या सीएसआर सहायक महाप्रबंधक विद्या पाल उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या उत्साही सहभागाचे कौतुक करताना सांगितले की,
“महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव आणि कायद्याचे ज्ञान मिळवून देणे म्हणजे समाज सशक्त करण्याचा पाया आहे. लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे असे उपक्रम पुढेही सातत्याने राबवले जातील.”
या सत्राद्वारे महिलांमध्ये आत्मविश्वास, कायदेशीर जागरूकता आणि समाजातील सक्रिय सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांनी सत्राबद्दल समाधान व्यक्त करत, अशा अधिक उपयुक्त मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
हा उपक्रम लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या ‘महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जागरूकता’ या ध्येयाशी सुसंगत असून, घुग्घुस परिसरातील महिलांसाठी प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरला.








