डी.बी.चा मोरक्या, गुन्हेगारांचा दोस्त – राजुरा पोलिसांवर जनतेचा रोष!
एकाच मोरक्यामुळे संपूर्ण डी.बी. विभाग निशाण्यावर!

राजुरा: राजुरा पोलिस स्टेशनमधील डी.बी. विभाग सध्या जनतेच्या रोषाचे केंद्रबिंदू ठरला आहे. कारण एकच — या विभागातील एका मोरक्याच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण डी.बी. विभागाची प्रतिमा धुळीत मिळाली आहे. शहरात वाढलेल्या गुन्हेगारीसाठी आणि अवैध धंद्यांना संरक्षण देण्यासाठी हेच मोरक्या आणि त्याचे काही बगलबच्चे जबाबदार असल्याचे गंभीर आरोप होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राजुरा शहर आणि परिसरात झेंडी-मुंडी, जुगार, सट्टा, सावकारी, ड्रग्ज विक्री, तसेच कोंबडा बाजार अशा अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व व्यवसाय डी.बी.च्या संरक्षणाखालीच सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या अवैध ठिकाणांवर छापे पडण्यापूर्वीच माहिती गळती होत असून, काही ठिकाणे पोलिसांच्या सांगण्यावरूनच बदलली जातात.
नवरात्र काळात विवेकानंद नगर परिसरात घेतलेल्या कारवाईत १५ इसमांना पकडण्यात आले होते. मात्र, त्यापैकी फक्त ६ जणांवरच गुन्हा दाखल करण्यात आला. उर्वरितांना ‘डी.बी.च्या छत्रछायेखाली’ सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर एका पोलीस शिपायाने स्वतःच्या बाईकवर आरोपीला पोलिस स्टेशनमधूनच फरार केल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे डी.बी. पथकाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणात शहरातील एका नामांकित वकिलाचे नावही समोर येत आहे. त्याने तब्बल ५० हजार रुपये देऊन स्वतःची सुटका करून घेतल्याची चर्चा सध्या जोरात आहे. यामागे असलेली मध्यस्थांची टोळी आणि पोलिस संरक्षण यांची नावे लवकरच उघडकीस आणली जातील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांच्या जिल्ह्यातच राजुरा डी.बी. पथक गुन्हेगारांना हाताशी धरून काम करत असल्याचे चित्र अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे पोलिस दलाच्या स्वच्छ प्रतिमेला डाग लागला असून, राजुरा पोलिस स्टेशनमधील संपूर्ण डी.बी. विभागाची चौकशी व मोरक्याची तत्काळ बदली किंवा निलंबन करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
राजुऱ्यात आता प्रश्न एकाच आहे —
“गुन्हेगार पकडणारे पोलीस गुन्हेगारांचेच दोस्त झाले तर न्याय कुणाकडून मागायचा?”
(क्रमशः…)








