“सरकार कुठे झोपलीये? जनता खड्ड्यात, प्रशासन हवेत!”
सातरी चनाखा बहुजन हिताय ऑटो चालक-मालक संघटनेचा पुढाकार ; चुनाळा-विहिरगाव मार्गावरील खड्डेमय रस्त्यावर स्वखर्चाने टाकला मुरूम

राजुरा (तालुका प्रतिनिधी) : राजुरा तालुक्यातील चुनाळा-विहिरगाव हा मार्ग गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला होता. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील मोठमोठे खड्डे एवढे भयावह झाले की प्रवाशांना आणि वाहनचालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि प्रवासी यांनी वारंवार तक्रारी, निवेदने, अर्ज देऊन प्रशासनाला साद घातली — पण नेहमीप्रमाणे केवळ आश्वासनांची फसवी फुंकरच मिळाली.
शासनाकडून कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने अखेर “सातरी चनाखा बहुजन हिताय ऑटो चालक-मालक संघटनेने” सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत जनहितासाठी पुढाकार घेतला. कोणत्याही राजकीय किंवा शासकीय मदतीशिवाय संघटनेने स्वतःच्या खिशातून खर्च करून सहा ते आठ ट्रॅक्टर मुरूम टाकून रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविले.
या कार्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवाशांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. प्रवासी म्हणतात की, “सरकारने करायचं काम आता जनतेलाच करावं लागतंय. आम्ही कर भरतो, पण बदल्यात खड्डे मिळतात.”
या उपक्रमाबद्दल नागरिकांनी ऑटो संघटनेचे मनःपूर्वक आभार मानले असून, या कृतीने शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठा सवाल उभा राहिला आहे.
प्रश्न निर्माण होतो की?
१) लोकांच्या कराच्या पैशाने चालणारे रस्ते विभाग आणि ग्रामपंचायत नेमके करत काय आहेत?
२) ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही का होत नाही कारवाई?
३)जर नागरिक आणि संघटना स्वतःच रस्ते दुरुस्त करत असतील, तर प्रशासनाची जबाबदारी काय उरते?
सातरी चनाखा बहुजन हिताय ऑटो चालक-मालक संघटनेने केलेला हा सामाजिक उपक्रम जनतेच्या वेदनेतून जन्मलेला आहे — आणि शासनाला एक स्पष्ट संदेश देणारा आहे की, “जनतेला फसवणाऱ्या निष्क्रिय यंत्रणेच्या जागी आता जनता स्वतः उठते आहे.”
यावेळी सुरज खेडेकर, राजू मोरे, अमित नगराळे, मिलिंद लोखंडे, राहुल बोबडे,सूरज सोयाम,अरुण कार्लेकर, राहुल निरंजने, प्रशांत लोणारे, रवींद्र मोरे, प्रेम चितलवार, शंकर तोडासे, आनंद पाटील या सर्व चनाखा सातरी ऑटो चालक बंधूनी मोलाचे सहकार्य केले.








