आदिवासी समाजाची थट्टा? जंगोदेवी देवस्थान परिसराचा विकास शून्य
आदिवासी समाजाची दसरा महापूजा चिखलमय वातावरणात
जिवती :- तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश सीमेवर असलेले आदिवासी समाजाची आराध्य दैवत माता जंगोदेवी देवस्थान परिसर अतिशय चिखलमय झाला आहे.
आज आदिवासी समाजाची दसरा महापूजा निमित्त आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो आदिवासी बांधव कोटापरमडोली स्थित जंगोदेवी देवस्थान परिसरात दाखल झाले परंतु मुसळधार पावसाने या ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाले. रात्रभर चालणाऱ्या या महापुजेसाठी आलेल्या भाविकांची याठिकाणी राहण्याची गैरसोय झाल्याने समाज बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या पूर्वीही मा. पालकमंत्री, यांच्यासह माजी पालकमंत्र्यांसोबतच राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार महोदय यांना जंगोदेवी देवस्थान परिसरात गट्टू बसविणे, परिसरात भक्त निवास बांधकाम करणे, भव्य सभागृहाचे बांधकाम करणे, संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, शौचालयाचे बांधकाम करणे अशा विविध मागण्यांचे निवेदन देऊन सुद्धा लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करताना दिसत असल्याचा आरोप रायताड जंगोदेवी देवस्थान समितीचे सदस्य गजानन पाटील जुमनाके यांनी केला आहे.
आदिवासी समाजाच्या रूढी परंमपरेनुसार दसरा महापूजा होते या सह जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी एक महिना आदिवासी समाजाच्या वतीने महापूजा केली जाते, त्यावेळी हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाजूच्या आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यातील भाविक येऊन आराध्य दैवत माता जंगोदेवीची पूजा अर्चा करतात या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असल्याने जंगोदेवी देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात यावा अशी मागणी गजानन पाटील जुमनाके यांनी केली आहे.
शासनाने आदिवासी समाजाच्या या तीर्थ क्षेत्राला क वर्ग तीर्थ क्षेत्र म्हणून घोषित केले आहे आता या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता अ वर्ग तीर्थ क्षेत्र म्हणून घोषित करून या ठिकाणच्या परिसराचा सर्वांगीण विकास करावा अशी मागणी समाज बांधवांकडून होत आहे.
या परिसरात रहाण्याची उत्तम सोय, देवस्थान परिसरात गट्टू बसविणे, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयाची सोय अशा विविध मागण्यांचा विकास आराखडा तयार करून या ठिकाणच्या परिसराचा विकास करण्यात या अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात येत आहे.








