रेती तस्करीचा कर्करोग : प्रशासन लकवाग्रस्त, तस्करांचा उर्मटपणा शिगेला
राजुरा, २ सप्टें. :- राजुरा तालुक्यातील विहिरगाव, कोहपरा, पंचाळा परिसरातील नदी-नाल्यांवर सुरू असलेली रेती तस्करी आता कर्करोगासारखी पसरली आहे. पण दुर्दैव असे की शासन व प्रशासन या कर्करोगावर इलाज न करता लकवाग्रस्त दिसून येत असून पांगुळा झाल्यासारखे वागत आहे.
३१ ऑगस्टच्या रात्रीचा अनुभव तर जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारा आहे. गस्तीसाठी नियुक्त तलाठी रमेश बोरेकर व त्यांचा चमू चूनाळा रेल्वे गेटवर उपस्थित होते. त्याचवेळी विहिरगाव नाल्यावरून तब्बल सहा ट्रॅक्टर रेती चोरीला गेल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. मात्र गस्ती पथक घटनास्थळी पोहोचलेच नाही! उलट जनतेलाच सांगण्यात आले की “आम्ही राऊंड घालून आलो, पण काहीच दिसले नाही.” स्थानिकांनी मात्र स्पष्ट पाहिले की ट्रॅक्टर भरधाव वेगाने गेले होते. एवढेच नव्हे तर तलाठी गस्तीदरम्यान तस्करांच्या माणसांशीच फोनवर बोलताना दिसल्याचे आरोप आहेत.
यातले सर्वात गंभीर म्हणजे – या तस्करीत वापरली जाणारी बहुतेक ट्रॅक्टर गाड्यांची पासिंग नाही, इन्शुरन्स नाही, ड्रायव्हरचे परवाने नाहीत. अशा गाड्या रात्री-अपरात्री जनतेचा जीव धोक्यात घालून भरधाव पळतात. उद्या एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? या यक्ष प्रश्न आहे.
परिवहन विभाग मात्र आपल्या फिरत्या पथकाद्वारे फक्त गोरगरीब शेतकऱ्यांच्या गाड्यांची तपासणी करतो. तस्करांच्या वाहनांना मात्र अलिखित अभयदान दिले गेले आहे का? असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
विहिरगाव हा परिसर विरुर पोलिस स्टेशन हद्दीत येतो. पण ठाणेदारांची निष्क्रियता एवढी ठळक आहे की तस्करच पोलिसांपेक्षा जास्त सक्रिय असल्याचे बोलके उदाहरण निर्माण झाले आहे. पैसे घेऊन पोलिस ठाणे डोळेझाक करते असा जाहीर आरोप ग्रामस्थ करत आहेत.
तस्करी करणारे बहुतेक राजकीय कार्यकर्ते वा आप्तेष्टच असल्याने त्यांना वरून संपूर्ण अभय मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासन, पोलीस व परिवहन विभाग सर्वच सहभागी वा मौनदर्शक झाल्याचे चित्र दिसते. यामुळे महसूल विभाग व पोलीस विभाग हप्ताखोरीने ग्रासले असल्याचे समजते.
दरम्यान, शासनाचा डिझेल खर्च गस्तीच्या नावाखाली उधळला जात असला तरी प्रत्यक्ष कारवाई मात्र शून्य आहे. दुसरीकडे निसर्गाची हानी मात्र वेगाने सुरू आहे. विहिरगाव नाल्यावर सुरू असलेली ही लूट थांबवली नाही, तर येणाऱ्या पिढ्यांना निसर्गाचा कोप भोगावा लागेल हे निश्चित आहे.
या तस्करांच्या भरधाव बेकायदेशीर गाड्यांची तपासणी व जबाबदारी कोण घेणार?
शासन व प्रशासन या कर्करोगावर शस्त्रक्रियेप्रमाणे कठोर कारवाई करणार की तस्करांच्या उंबऱ्याशीच नतमस्तक राहणार?
काल रात्री रेती माफियानी पाच ते सहा ट्रॅक्टर च्या माध्यमातून रेतीची उचल केली असून रात्रपाळीत हायवा ने तालुक्याच्या बाहेर रेतीची बिनदिक्कत वाहतूक केली. मात्र प्रत्यक्ष गस्त घालत असलेले फिरते पथक यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आज सकाळ ला दिखव्या करिता पाच ब्रास रेतीसाठा जप्त केला आहे. मात्र या मुजोर व अट्टल रेती माफियांच्या वाहनावर कार्यवाही करून यांचे कंबरडे मोडेल काय याकडे स्थानिक सुजाण जनतेचे लक्ष लागले आहे.








