Home चंद्रपूर “राजुरा शहराला कोणी ट्रॅफिक पोलिस देता का, ट्रॅफिक पोलिस….??”

“राजुरा शहराला कोणी ट्रॅफिक पोलिस देता का, ट्रॅफिक पोलिस….??”

0
164

“राजुरा शहराला कोणी ट्रॅफिक पोलिस देता का, ट्रॅफिक पोलिस….??”

राजुरा (ता. प्र.) : राजुरा तालुका हा औद्योगिक नगरी म्हणून जिल्ह्यात तसेच राज्यात वेगळी ओळख असलेला तालुका आहे. लगतचे तेलंगणा राज्य, सततची औद्योगिक हालचाल आणि वाढती लोकसंख्या यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच ओव्हरलोड वाहनांची दैनंदिन ये-जा, अनियंत्रित गर्दी व नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसते.

संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात कुठल्याच तालुक्यात पाच आमदार नाहीत – हा मान फक्त राजुराला मिळाला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था काटेकोर राखण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर आहे. पण अलीकडील काळात झालेल्या अपघातांनी या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जी मूलभूत हमी वाहतूक विभागाकडून अपेक्षित आहे ती आजवर पूर्ण झालेली नाही, ही खंत सर्वत्र व्यक्त होते.

शहरातील संविधान चौक, बसस्थानक चौक, नाका क्र. ३, रामपूर टी-पॉइंट यांसारख्या मुख्य ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी व गोंधळ निर्माण होतो. तरीसुद्धा तिथे वाहतूक शिपाई प्रत्यक्षात दिसत नाहीत. “अपघात झाला की अचानक हजर – बाकी वेळेला जणू मिस्टर इंडियाचे घड्याळ घालून गायब” अशी नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया आहे.

दरम्यान, शहरात कॉलेज तरुण व रिकामटेकडे भर रस्त्यात गोंधळ घालताना, कर्कश हॉर्न वाजवत मजनुगिरी करताना आढळतात. या प्रकारामुळे केवळ वाहतुकीत व्यत्यय येत नाही तर नागरिकांच्या जीविताससुद्धा धोका निर्माण होतो. कायद्याचा धाक उरला नसल्याचे बोलके उदाहरण दररोज पाहायला मिळते.

राजुरा शहरातील जनता वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेला कंटाळली असून, त्वरित कारवाई करून मुख्य चौकांवर वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, ओव्हरलोड वाहनांवर कठोर नियंत्रण ठेवावे आणि कायदा मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही करावी अशी जनतेची ठाम मागणी आहे.

👉 “अपघातानंतर पोलिस धावून येतात, पण अपघात टाळणारी वाहतूक शिस्त कधी येणार?” असा प्रश्न राजुरातील जनता प्रशासनाला थेट विचारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!