Home चंद्रपूर राजुरा शहरात दूषित पाणीपुरवठा : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ – प्रशासन झोपेतच?

राजुरा शहरात दूषित पाणीपुरवठा : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ – प्रशासन झोपेतच?

0
106

राजुरा शहरात दूषित पाणीपुरवठा : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ – प्रशासन झोपेतच?

राजुरा (प्रतिनिधी) :

राजुरा नगर परिषदेकडून शहरात होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा दर्जा अत्यंत खालावल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. १ मे २०२६ पासून नागरिकांना नळाद्वारे येणारे पाणी पिण्यास अयोग्य, दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे. या संदर्भातील एक बोलका फोटोही समोर आला असून, पाण्याचा रंग पिवळसर-हिरवट दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांचा संताप उफाळून आला असून, “नळ बिल वेळेवर भरूनही जर पिण्यायोग्य पाणी मिळत नसेल, तर आम्ही कर का भरावा?” असा थेट सवाल प्रशासनाला विचारला जात आहे. ऐन उन्हाळ्यात उष्णतेची दाहकता उच्च सीमा गाठत पाण्याची असतानाच दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना दुहेरी फटका बसत आहे.

दरम्यान, काही सजग नागरिकांनी नगर परिषदेला फोनद्वारे तसेच व्हॉट्सअॅप गटांवरून तक्रारी केल्या. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे “नगर परिषद प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

१ मे रोजी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला, पण त्याच दिवशी नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ येणे ही प्रशासनाची गंभीर बेपर्वाई असल्याचे मत व्यक्त होत आहे. मूलभूत सुविधा देण्यात अपयश येत असताना उत्सव साजरे करण्याचा दिखावा का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

नागरिकांनी पुढे विचारलेले काही मुद्दे प्रशासनासाठी धक्कादायक आहेत —

नागरिक आजारी पडल्यास जबाबदार कोण?

दूषित पाण्यामुळे विकत घ्यावे लागणारे पिण्याचे पाणी (वॉटर कॅन) याचा खर्च शासन देणार का?

पाणीपुरवठा निकृष्ट असल्यास नळ बिलात कपात होणार का?

नागरिक उशिरा कर भरल्यास दंड आकारला जातो, मग प्रशासन चुकल्यास त्यांच्यावर कोणती कारवाई होणार?

या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरितच आहेत. नगर परिषद प्रशासन व निवडून आलेले लोकप्रतिनिधी नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर आहेत का, असा संशय व्यक्त होत आहे.

शहरात दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार, त्वचारोग यांसारख्या साथींचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तात्काळ पाणी तपासणी, स्वच्छता उपाययोजना आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.जर लवकरात लवकर शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

राजुरा नगर परिषद प्रशासनाने आता तरी जागे होऊन नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!