Home चंद्रपूर तप्त उन्हात अनुभवांचा गारवा ; गडचांदूर येथे ज्येष्ठ नागरिक संघाचा अमृत महोत्सव...

तप्त उन्हात अनुभवांचा गारवा ; गडचांदूर येथे ज्येष्ठ नागरिक संघाचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न

0
116

तप्त उन्हात अनुभवांचा गारवा ; गडचांदूर येथे ज्येष्ठ नागरिक संघाचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न

आ. देवराव भोंगळे व नगराध्यक्ष निलेश ताजने यांच्या उपस्थितीत १८ ज्येष्ठांचा गौरव

 

गडचांदूर (प्रतिनिधी):-

मार्च महिन्याचे तप्त ऊन आणि रखरखत्या झळा अशा वातावरणातही स्थानिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या सांस्कृतिक भवनात १५ मार्च रोजी एक वेगळाच ‘चैतन्याचा गारवा’ अनुभवण्यास मिळाला. निमित्त होते, ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित अमृत महोत्सव आणि १८ ज्येष्ठ सदस्यांच्या कार्याचा गौरव सोहळा!

दिग्गजांची मांदियाळी
या बहारदार सोहळ्याचे उद्घाटन राजुरा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय देवरावजी भोंगळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्यरत्न पुरस्कार प्राप्त, गडचांदूर नगरीचे नगराध्यक्ष माननीय निलेशजी ताजने उपस्थित होते. मंचावर संघाचे अध्यक्ष माननीय हरिश्चंद्रजी अरोरा व मा. थिपे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनुभवांच्या शिदोरीचा सन्मान
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाचे उपक्रमशील प्राचार्य बाळासाहेब मोहितकर यांनी प्रास्ताविक केले. “वयाची ७५ वर्षे ओलांडल्यानंतरही समाजाचे ऋण फेडण्यासाठी संघ नानाविध उपक्रम राबवून सुयोग्य दिशा देत आहे,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार भोंगळे व नगराध्यक्ष ताजने यांचा संघातर्फे थाटात सत्कार करण्यात आला. त्यानंतर बाळासाहेब मोहितकर, वामनराव मत्ते आणि इतर १८ ज्येष्ठ सदस्यांचा त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला.

लोकप्रतिनिधींकडून कौतुकाची थाप
प्राचार्य वामनराव मत्ते यांनी अतिथींचा सखोल परिचय करून दिला. आमदार देवरावजी भोंगळे यांनी ज्येष्ठांच्या कार्याची दखल घेत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी, “मरण्यापेक्षा जगण्यावर विश्वास ठेवणाऱ्या या ज्येष्ठांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. दोन्ही नेत्यांच्या ‘फिनिक्स’ भरारीचे वर्णन ऐकून उपस्थित ज्येष्ठ नागरिक स्तंभित झाले.

युवा शक्तीचा सहभाग
या सोहळ्याला ‘आदर्श हिंदी विद्या मंदिरा’च्या मुख्याध्यापिका डॉ. मंजुषा मते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला अधिकच शोभा आली. कार्यक्रमाचे संचालन मस्के सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अवघडे सर यांनी मानले. डॉ. भोयर, मा. डाहुले सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

शेवटी, अन्नदाता डॉ. भोयर यांच्या सौजन्याने सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!