फुले–आंबेडकर जयंती महोत्सव सप्ताह नियोजनासाठी गावाची संयुक्त बैठक
विरूर स्टेशन l अविनाश रामटेके
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे एप्रिल महिन्यात ११ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान साजरा होणाऱ्या महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव सप्ताहाच्या नियोजनासाठी रमाई बौद्ध विहार येथे गावातील सर्व समाजांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.
ही बैठक पंचशील महिला बौद्ध समाज मंडळ तसेच नवयुवक बौद्ध समाज मंडळ, विरूर यांच्या वतीने शाहू नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
या बैठकीला विरूर येथील कुणबी समाज, आदिवासी समाज, मातंग समाज, परीट समाज, नाभिक समाज, कुंभार समाज, धनगर समाज, शीख समाज, मुस्लिम समाज, माळी समाज गाडी लोहार समाज आदी विविध समाजांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह उत्साहात व एकोप्याने कसा साजरा करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी आपापली मते व सूचना मांडून कार्यक्रम अधिक यशस्वी करण्यासाठी सहकार्याची भूमिका व्यक्त केली.
बैठकीचे प्रास्ताविक अविनाश रामटेके यांनी केले, तर संचालन सचिन पिपरे यांनी केले. या प्रसंगी बौद्ध समाजातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.








