Home गडचिरोली गडचिरोली शहरातील वाढत्या अपघातांवर नियंत्रणासाठी रिंगरोडची तातडीची मागणी

गडचिरोली शहरातील वाढत्या अपघातांवर नियंत्रणासाठी रिंगरोडची तातडीची मागणी

0
44

गडचिरोली शहरातील वाढत्या अपघातांवर नियंत्रणासाठी रिंगरोडची तातडीची मागणी

नगराध्यक्षा अॅड. प्रणोती निंबोरकर यांची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याशी सकारात्मक चर्चा

 

गडचिरोली, सुखसागर झाडे :- शहरात वाढत चाललेल्या वाहतूक कोंडी व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर शहराला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी रिंगरोड उभारणीची तातडीची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात नगराध्यक्षा अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले व सकारात्मक चर्चा केली.

गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. शहरातूनच मोठ्या मालवाहू ट्रक व इतर जड वाहने जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते आणि अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः शाळा-कॉलेज परिसर, बाजारपेठ आणि प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचा ताण अधिक जाणवत आहे.

या वाढत्या अपघातांमध्ये कित्येक निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर शहराच्या बाहेरील भागातून रिंगरोड उभारल्यास जड वाहतूक शहराबाहेरून वळवता येईल, ज्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे मत नगराध्यक्षा निंबोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजांना लक्षात घेता रिंगरोड प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मागणीची दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रस्तावाबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. शहराच्या सुरक्षित व नियोजित विकासासाठी रिंगरोड प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

गडचिरोली शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी व नागरिकांचे जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी रिंगरोड प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी तातडीची मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने यावर तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!