Home गडचिरोली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाला भेट

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाला भेट

0
124

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाला भेट

भामरागड :- आज दि. १३ फेब्रुवारी रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देऊन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान त्यांनी प्रकल्पांतर्गत रुग्णालय, निवासी आश्रमशाळा आणि आदिवासी भागासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य व सामाजिक उपक्रमांची सविस्तर पाहणी केली.

यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्यानंतर इतक्या दुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी भागात सेवा देण्याची प्रेरणा कशी मिळाली, अशी विचारणा डॉ. आमटे यांना केली. त्यावर उत्तर देताना डॉ. आमटे यांनी सांगितले की, गेली तब्बल ५२ वर्षे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून गोरगरीब आदिवासी समाजाला आरोग्य, शिक्षण व मानवतावादी सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. प्रारंभीच्या २२ वर्षांत या भागात वीज सुविधा देखील उपलब्ध नव्हती, तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सेवा अखंडपणे सुरू ठेवली, असे त्यांनी नमूद केले.

प्रकल्पामध्ये शासनाच्या विविध आरोग्य योजना प्रभावीपणे राबविल्या जातात का, तसेच शासनाकडून आणखी कोणत्या प्रकारची मदत अपेक्षित आहे, याबाबत मंत्री महोदयांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी सर्पदंशावरील औषधो पचारासाठी विशेष सवलत व अधिक सक्षम सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा डॉ. आमटे यांनी व्यक्त केली. भामरागड परिसरात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडत असल्याने या संदर्भातील औषधे व उपचार व्यवस्थेला अधिक बळ देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या भेटीत डॉ. प्रकाश आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे तसेच लोकबिरादरी प्रकल्पातील सदस्यांशी संवाद साधण्यात आला. स्थानिक आरोग्य व्यवस्थेतील अडचणी, दुर्गम भागातील रुग्णवाहिका सेवा, औषधसाठा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आदी विषयांवर सखोल चर्चा झाली. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्थानिक नागरिकांची आरोग्यविषयक निवेदने स्वीकारून त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर मंत्री महोदयांनी भामरागड ग्रामीण रुग्णालय व अहेरी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील पायाभूत सुविधा, रुग्णसेवा, उपलब्ध मनुष्यबळ आणि औषधसाठ्याचा आढावा घेतला. दुर्गम व आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी आरोग्य विभागाचे संचालक डॉ विजय कंदेवाड, सहसंचालक रामजी आडकीकर, उपविभागीय अधिकारी अमर राऊत, आरोग्य उपसंचालक डॉ .शशीकांत शंभरकर, डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे व इतर अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!