🔴 ब्रेकिंग न्यूज | राजुरा
चुनाळा येथे घरगुती वादातून पत्नीचा खून ; पती पोलिसांच्या ताब्यात
राजुरा मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चुनाळा गावात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव सौ. रोशनी उईके (वय २५ वर्षे) असून आरोपी पतीचे नाव रविशंकर उईके आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
रविशंकर व रोशनी हे मूळचे मध्यप्रदेशातील इटारसी येथील रहिवासी असून सध्या ते चुनाळा येथे वास्तव्यास होते. आरोपी रविशंकर हा जेसीबी चालक असून त्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत पती-पत्नीमध्ये वारंवार वाद आणि मारहाण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेच्या दिवशीही दारूच्या नशेत रविशंकरने पत्नी रोशनीसोबत वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात त्याने रोशनीचा गळा आवळून खून केला.
या प्रकरणी फिर्यादी राजू शर्मा यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवर, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार, पोलीस उपनिरीक्षक उल्लेवर व पोलिस उपनिरीक्षक कोमल घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या भीषण घटनेने चुनाळा गावात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.








