२४ वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र — आठवणींचा ओलावा, शिक्षकांचा सन्मान
बाखर्डी | कोरपना तालुका :कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी येथे दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन आणि शिक्षक सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल २४ वर्षांनंतर सर्व मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पुष्पा कोटेवार, तर प्रमुख अतिथी म्हणून किशन गुरुनुले, रमेश रामटेके, ज्योतिराम गावंडे, देवानंद दुर्गे, सुनील डोंगे, प्रभाकर सावे व कैलास मेश्राम उपस्थित होते. डॉ. महाकाळकर यांनी “आई एक नाव असतं” ही कविता सादर करत सगळ्यांना जुन्या दिवसांच्या आठवणीत नेले.
जुने विद्यार्थी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुन्हा जोडले गेले आणि दिवाळीच्या निमित्ताने या शाळेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. सुमारे ६० माजी विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वांनी आपला परिचय देत बालपणीच्या आठवणी शेअर केल्या.
शाळेसाठी जमीन दान देणाऱ्या बनराव मत्ते यांच्या पत्नी शेवंताबाई मत्ते, उत्कृष्ट विद्यार्थी आणि शिक्षकांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला पोडियम डायस भेट दिला. किशन गुरुनुले यांनी “शेतकरी असणे ही संस्कृती आहे” असे सांगत शेतीतील नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात पुष्पा कोटेवार यांनी “ग्रामीण शाळांच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत” असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिनू निरंजने यांनी, प्रस्तावना उमेश राजुरकर यांनी तर आभार उज्वला मांढरे यांनी मानले. बबन पेंदोर, देवेंद्र ढवस, रत्नाकर पिदुरकर, अमोल निरंजने, स्वप्नील धोटे, दिवाकर सावे, अनिल पिंपळशेंडे, देविदास बांदुरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचा संकल्प करत कार्यक्रमाचा समारोप गोड आठवणींनी झाला.







