Home चंद्रपूर डोळे उघडणारी हाक! – राजुरा शहर व तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था ठरतेय जीवघेणी…

डोळे उघडणारी हाक! – राजुरा शहर व तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था ठरतेय जीवघेणी…

0
200

डोळे उघडणारी हाक! – राजुरा शहर व तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था ठरतेय जीवघेणी…

राजुरा : राजुरा शहर व तालुक्यातील मुख्य राज्य महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ लांबत आहे. अपूर्ण कामामुळे शहर असो वा गाव – सर्वत्र रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. धुळीने व्यापलेले रस्ते, खोल खड्डे, रात्री अंधारात गायब होणारे रस्त्यांचे अस्तित्व आणि वाहतुकीवर नियंत्रण नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.

राजुरा ते लक्कडकोट महामार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. वाहन चालवणाऱ्यांची गाडी खड्ड्यांमध्ये आदळून मणक्याचे विकार, पाठीचे आजार, डोळ्यांचे त्रास आणि श्वसनाचे आजार सामान्य झाले आहेत. खड्ड्यात गाडी अडकल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील कोणाचा नातेवाईक बाहेर गेला की घरी परतण्याची भीती घरच्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.

रात्री रस्त्यांवर कोणतेही रेडियम नाही, अपघात रोखण्यासाठी चेतावणी फलक नाहीत. मुख्य चौकात वाहतूक पोलिस नाहीत. अवजड वाहनांची बेफाम वाहतूक सुरू असून, फिटनेस संपलेली, इन्शुरन्स नसलेली आणि परवाना नसलेली वाहने निर्बंधांशिवाय धावत आहेत. परिवहन विभागाच्या कारवाईला फक्त छोट्या वाहनांपुरतेच मर्यादित ठेवून मोठ्या वाहनांना मोकळे रान दिले जात आहे. सुजाण नागरिकांकडून आरोप होत आहे की ट्रान्सपोर्टरकडून मिळणाऱ्या पैशामुळे कारवाई टाळली जात आहे.

पर्यावरण विभागाच्या कुंभकर्णी झोपेमुळे धुळीमुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. श्वसनाचे आजार, डोळ्यांचे त्रास आणि त्वचेचे विकार वाढत आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करून उद्योगांपासून मिळणाऱ्या लाभांमध्ये विभाग मग्न असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

या सगळ्या गोंधळात कष्टकरी, शेतकरी आणि मध्यमवर्गीय लोकांचा जीव जात आहे. पैशाच्या हव्यासात माणुसकी, पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षितता यांना दुय्यम स्थान मिळत चालले आहे. आज प्रत्येक जण स्वतःचा फायदा बघतोय, समाजाची आणि निसर्गाची काळजी घेणारे हात कमी झाले आहेत.

राजुरा तालुक्यातील जनतेला या दुर्दशेपासून मुक्ती हवी आहे. शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी वेळेवर काम पूर्ण करावे, अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावी, वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी ठोस योजना जाहीर करावी. नुसती आश्वासने नव्हे तर कृतीतून उत्तर हवे.

ही परिस्थिती केवळ एका तालुक्याची नाही, तर संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे. आजच जागे होऊन आवाज उठवला नाही तर उद्या खड्ड्यांत गाडलेले जीव आणि धुळीत हरवलेले आरोग्य याशिवाय काहीही उरणार नाही.

जनतेला आवाहन – एकत्र या, समस्यांचे दस्तऐवजीकरण करा, निवेदन द्या, आणि न्यायासाठी लढा उभारा. सुरक्षित रस्ते, स्वच्छ हवा आणि निरोगी जीवन हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!