Home चंद्रपूर ‘रात्रीस खळे चाले’ असे मराठी चित्रपटाचे गीत होते पण आता या उलट...

‘रात्रीस खळे चाले’ असे मराठी चित्रपटाचे गीत होते पण आता या उलट विहीरगाव नाल्यावर भरदिवसा खेळ चाले रेती चोरट्यांचा असे म्हणावे लागेल…

0
312

‘रात्रीस खळे चाले’ असे मराठी चित्रपटाचे गीत होते पण आता या उलट विहीरगाव नाल्यावर भरदिवसा खेळ चाले रेती चोरट्यांचा असे म्हणावे लागेल…

राजुरा :- वरुण राजाने दमदार हजेरी लावल्याने सध्या तालुक्यातील ओढ्या-नाल्यात उच्च प्रतीची मुबलक रेती जमा झाली आहे. याकडे तालुक्यातील ट्रॅक्टर मालकांनी आपली अचूक नजर हेरून दिवसाढवळ्या रेती उपसा करण्याकडे आपले लक्ष वळविले आहे. ‘शासनाचा कणा असलेला महसूल विभागाचा बाणा’ मात्र या अट्टल रेती माफियांवर आवर घालण्यात कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

विहीरगाव येथे मुख्य रस्त्यालगत वाहणाऱ्या नाल्यातून भरदिवसा ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावर उभी करून रेती भरण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. सदर रेती डंप करून हायवा ने चढ्या किमतीत विकली जात असताना महसूल विभाग अनभिज्ञ असल्याने परिसरातील सुजाण नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भरदिवसा कसल्याही कारवाईला न जुमानता मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर उभी करून रेतीची उचल केली जात असल्याने या मुजोर व अट्टल रेती माफियांपुढे महसूल विभागाने गुडघे टेकले आहेत का..? असे या प्रकारामुळे स्पष्टपणे दिसून येत आहे.

महसूल विभाग फक्तं कागदाच्या रंगीत नोटा जमा करण्यात मगशुल आहे असे म्हणायची वेळ नागरिकांवर ओढवली आहे. शासनाच्या पगारा शिवाय बिचारे रेती खाऊन जगत आहेत की काय..? अशी सत्य परिस्थिती राजुरा तालुक्यातील प्रत्येक नाल्यालगत असलेल्या गावात बघायला मिळते. यांचं पोट फुगेपर्यंत हे शासकीय कर्मचारी काही मानत नाही आणि रेती तस्कर आपल्या बापाचीच सर्व खनिज संपत्ती म्हणून कोणालाही न घाबरता बिनधास्त रान उठवून ६ हजार ७ हजार अश्या ज्यादा दराने रेती, गौण खनिज विकत आहेत. तालुका महसूल विभाग महसूल बुडवून आपला वयक्तिक महसूल वाढवण्यावर भर देत आहे.

तस्कर म्हणतो “कोणी काही करत नाही, बिनधास्त रहा आपली सर्व सेटिंग आहे. तू मार ट्रिप जास्तीत जास्त.” पोलिस प्रशासन रसद गिळून गप्प आहे. त्यांच्या डोळ्याला एकही ट्रॅक्टर रात्रीच्या गस्ती मध्ये तर नाहीच नाही पण भरदिवसाही दिसत नाही. स्वास्थ्य शिबिरात यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी अशी जनतेची लोकप्रतिनिधींकडे मागणी आहे. गरीब मजूर नागरिक घरकुल बांधकाम रेतीसाठी मागणी करत आहेत मात्र रेती माफिया महसूल विभागाला हाताशी धरून हायवाने रेती बाहेर ठिकाणी पाठवून रग्गड पैसा कमवत आहेत.

विहीरगाव येथील तीन ट्रॅक्टर तर राजुरा येथील दोन ट्रॅक्टर सातत्याने रेतीची उचल करून बिनदिक्कतपणे वाहतूक करत असताना तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. रात्रपाळीत हायवाने रेती तालुक्याच्या बाहेर वाहतूक केली जात असताना महसूल व पोलीस प्रशासन झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसून येत असल्याने शंकेला पेव फुटले आहे.

सर्व प्रशासकीय यंत्रणेची एकदा मात्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी अशी जनतेची तीव्र मागणी आहे. जेणेकरून चांगल्या लेन्स लाऊन तरी त्यांच्या डोळ्याला या रेती तस्करीचा गोरख धंदा दिसेल व शासकीय महसूल वाढेल.

“आमची कारवाई सुरूच आहे. आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा आम्हाला रेती उचल करताना कोणी दिसत नाही.” – संघमित्रा गेडेकर, तलाठी, साजा विहीरगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!