Home चंद्रपूर संतप्त महिलांचे घुग्घुस-वणी मार्गावर चक्काजाम आंदोलन

संतप्त महिलांचे घुग्घुस-वणी मार्गावर चक्काजाम आंदोलन

0
159

संतप्त महिलांचे घुग्घुस-वणी मार्गावर चक्काजाम आंदोलन

पाण्याच्या खड्ड्यात बसून थाळी वाजविली

उड्डाणपुलाचे काम पुर्ण करण्याची मागणी, तब्बल तीन तास वाहतूक ठप्प

 

घुग्घुस: येथील घुग्घुस-वणी मार्गावरील राजीव रतन चौकात रेल्वे फाटकाजवळ निर्माणाधीन उड्डाणपुलाचे काम मागील ३ ते ४ वर्षांपासून संथगतीने सुरु आहे. या उड्डाणपुलाचे काम तत्काळ पुर्ण करण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजता राजीव रतन चौकातील रेल्वे फाटकाजवळ संतप्त महिलांनी पाण्याच्या खड्ड्यात बसून, डोक्याला काळ्यापट्ट्या बांधून थाळी वाजवून चक्काजाम आंदोलन केले व उड्डाणपुलाचे काम तत्काळ पुर्ण करण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे घुग्घुस-वणी मार्गावरची तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली. वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनात मोठया संख्येत महिला सहभागी झाल्या तसेच नागरिकांचे ही मोठे समर्थन आंदोलनास मिळाले.

रेल्वे अधिकारी व वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी लवकरच उड्डाणपुलाचे काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी ३:३० चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.

या ठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
काही दिवसांपूर्वी रुग्णवाहिका वाहतुकीच्या कोंडीत अडकल्याने एका गर्भवती महिलेचा व बाळाचा मृत्यू झाला. दररोज वारंवार रेल्वे फाटक बंद होत असल्याने एक ते दीड तास वाहतूक विस्कळीत होते. तसेच रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचून राहत असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे संतप्त महिलांनी चक्काजाम आंदोलन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता तसेच दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!