विद्युत स्मार्ट मिटर लावण्याला आम आदमी पार्टीचा विरोध
गडचिरोली, सुखसागर झाडे
दि. १२ ऑगस्ट :- आम आदमी पार्टी पक्षाचा स्मार्ट मिटर ला संपूर्ण विरोध व सध्याचे पोस्टपेड मिटर सुरू ठेवणे बाबत शेकडो सह्याचे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कम्पनी गडचिरोली यांना आज निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी अधिवेशन काळात स्मार्ट मिटर लावणार नाही अशी घोषणा केली होती.
राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात सदर मिटर कंपनी स्वखर्चाने मोफत लावणार अशी जाहिरात केली आहे. परंतु हे मिटर मोफत लावणार नाही याची जाणीव नागरिकांना आहे. वीज कायदा 2003 अधिनियम क्र 47 ( 5 ) नुसार कोणता मिटर वापरण्याचे स्वातंत्र्य कायदेशीर हक्क ग्राहकांना आहे. हक्क म्हणून पोस्टपेड मिटर कायम ठेवण्यात यावे. तथापी विद्युत ग्राहकांचे नुकसान लक्षात घेता स्मार्ट मिटर बसविण्यात येवू नये अन्यथा जोडणीला प्रखर विरोध करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना आपचे जेष्ठ नेते बाळकृष्ण सावसाकडे, संतोष कोटकर, जाणिकराव ननावरे, केशव सातपुते, नामदेव पोले, हरिदास सेलोटे, प्रभाकर मुत्यालवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









