“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” – जन्मदिवस साजरा करताना निसर्गसेवेचा आदर्श पायंडा!
राजुरा, दि. ०२ जुलै २०२५ –
जगभर वाढत्या तापमानाच्या झळा, वणवे, पाण्याची टंचाई आणि प्रदूषण यामुळे निसर्ग रडतोय… पण या झपाट्याने धावणाऱ्या दुनियेत काही संवेदनशील हृदय अजूनही निसर्गाशी नातं जपतायत. याचे ज्वलंत उदाहरण राजुरातील “नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था” यांनी त्यांचे अध्यक्ष अमोल जयाबाई सदाशिव राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त घालून दिलं.
आजकाल जन्मदिवस म्हटला की महागड्या केक कटिंग, डीजे पार्टी आणि दिखावा याशिवाय काही उरत नाही. पण अमोल राऊत यांनी निसर्गासाठी एक पाऊल पुढे टाकत आपल्या वाढदिवसाचा अर्थच बदलून टाकला. त्यांनी राजुरातील साई नगर वॉर्ड, शिवाजी नगर येथील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून त्या झाडांना ट्री गार्ड लावून सुरक्षिततेची कवच दिली. हा उपक्रम केवळ एक औपचारिकता न राहता, निसर्गाविषयीची आपुलकी, जबाबदारी आणि कृतज्ञता व्यक्त करणारा होता.
“आपण निसर्गाकडून भरभरून घेतो, पण त्याला परत काय देतो?” – या आत्मपरीक्षणातून स्फुरलेली ही कल्पना केवळ अमोल राऊत यांची वैयक्तिक भावना नव्हती, तर एक सामाजिक संदेश होता. या उपक्रमात नागवंश युथ फोर्सच्या सर्व सदस्यांसह साई नगरचे नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
वृक्षवल्ली, पक्षी, प्राणी हे निसर्गाचे घटक नाहीत तर आपले सोयरे – हे भान समाजात टिकवण्याचा वसा घेतलेली ही संस्था आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे.
निसर्गदत्त ऋण फेडण्यासाठी वाढदिवशी झाड लावा, पर्यावरणाचे रक्षण करा – ही संकल्पना प्रत्येक तरुणाच्या मनात रुजली पाहिजे. कारण आज झाडे लावली, तरच उद्या सावली मिळेल!
निसर्गावर प्रेम हे शब्दात नाही, कृतीत दिसले पाहिजे – हेच अमोल राऊत यांनी दाखवून दिलं!








