“नराधमांस फाशी द्या” संतप्त महिलाच्या आक्रोशाने चामोर्शी नगरी दुमदूमली
७ वर्षीय बालिकेवर रंगकाम करणाऱ्या नराधमाच्या अत्याचाराच्या निषेधार्थ हत्ती गेट ते पोलीस स्टेशनवर महिलांचा धडक विराट मोर्चा
चामोर्शी (गडचिरोली) सुखसागर झाडे, दि. 11जून : घराच्या रंगकामासाठी आलेल्या एका नराधमाने घरात खेळणाऱ्या सात वर्षीय निष्पाप चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या घृणास्पद प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, चामोर्शी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रज्वल उर्फ नारू सदाशिव भांडेकर (२५) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे.
एकांताचा घेतला होता फायदा ✅
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेच्या राहत्या घरात सध्या रंगकामाचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे ही सात वर्षांची बालिका घराच्या गच्चीवर खेळत होती. यावेळी तिथे रंगकाम करत असलेल्या प्रज्वल याने आजूबाजूला कोणीही नसलेची संधी साधली. चिमुरडीला एकांतात गाठून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
वैद्यकीय तपासणीनंतर नराधमाचे कृत्य उघड ✅
घटनेनंतर पीडित बालिकेला शारीरिक त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांच्या मनात संशय आला. त्यांनी तात्काळ तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. वैद्यकीय अहवालात बालिकेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट होताच कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. यानंतर पीडितेच्या मातेने तात्काळ चामोर्शी पोलीस ठाणे गाठून नराधम आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.
घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून चामोर्शी पोलिसांनी तात्काळ चक्रा फिरवली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील नवीन कलमांनुसार (कलम ६४(१), ६५(२) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा, २०१२) मधील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले करत आहेत. चिमुरडीवरील या अत्याचारामुळे चामोर्शी परिसरात बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नराधमाला फाशी ची कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरतं असून त्या निषेधार्थ संतप्त शहरातील महिला वर्गांचा विराट मोर्चा चामोर्शी पोलीस स्टेशन ला धडकला फाशीची शिक्षा नराधमांस झाली पाहिजे या घोषनेने संपूर्ण शहर दुमदूमले आहे. अशा भयाण कृत्य करणाऱ्या नराधमांस फाशी झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.








