आर्वी घाटावर वाळू माफियांचा सुळसुळाट ; रात्रपाळीत नदीपात्राला खाणीचे रूप

राजुरा / गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीवरील आर्वी रेती घाटाचा लिलाव केवळ नाममात्र असून याठिकाणी महिनोमहिने रात्र पाळीत नदी पात्रात जेसीबी पोकलंड उतरवून सर्रासपणे वाळू उपसा सुरू असल्याची गंभीर माहिती उघडकीस आली आहे. वाळू उचल करण्याकरिता ठरवून दिलेल्या क्षेत्रापलीकडे जाऊन वाळू उपसा केला जात आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे याठिकाणी अवैध पद्धतीने वाळूचा उपसा करून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न उघडपणे सुरू असल्याची माहिती आहे.
रोज रात्रपाळीत पोकलेन व जेसीबी मशिनच्या साहाय्याने पर्यावर्णीय मापदंडांना पायदळी तुडवत वारेमाप रेती उपसा सुरू असल्याचे खुले चित्र दिसून येत आहे. केवळ दिखावा म्हणून वैधरित्या रेती घाट घेऊन घाटधारका कडून अवैधरीत्या रेतीची उचल केली जात आहे. रेती घाट लिलाव अटी शर्ती नियमांना बगल देऊन घाटधारक मनमानी कारभाराने वाळूचा काळाबाजार सुरू झाल्याची चर्चा सुजाण नागरिकांत असून महसूल विभागाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रात्रपाळीत जणू खाणीचे रूप आल्याचे चित्र पाहावयास दिसून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासन या वाळू माफियांपुढे नतमस्तक झाले आहे का..? असा संतप्त सवाल आता जोर धरू लागला आहे.
आर्वी रेती घाटावर पाण्याचा प्रवाहाला सिमेंट काँक्रिट पाईप टाकून वाट मोकळी करून दिली जात असून नेमून दिलेल्या क्षेत्राच्या बाहेरील रेतीचा उपसा केला जात असल्याची चर्चा परिसरात जोरात सुरू आहे.
सामान्य नागरिकांना नियमांचे पालन करा म्हणून सांगणारे प्रशासन मात्र अवैध वाळू माफियांना मोकळीक कशी काय देते..? हे सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचे दिसून येत आहे.
वाळू माफियांकडून नियमांची सर्रास पायमल्ली होत असून सुद्धा तालुका महसूल प्रशासन मात्र अर्थपूर्ण कारणामुळे दुर्लक्ष करत आहे का..? असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने या अट्टल वाळू माफियांवर संगठित गुन्हेगारी सारखी कठोर कारवाई करिता पाऊले उचलणे अती आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात वर्धा नदीचेही पात्र कोरडे होईल. व विनाशाचा डोंगर उभा राहून पर्यावरणाचा समतोल बिघडेल यात मात्र तिळमात्र शंका नाही.







