४३° तापात चंद्रपुरात आमरण उपोषण; प्रशासनाची बघ्याची भूमिका
“स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना नोकऱ्या” युवकांचा आक्रोश
चंद्रपूर :- औद्योगिक जिल्हा म्हणून नावाजलेल्या चंद्रपुरात स्थानिक युवकांना रोजगार नाकारला जात असल्याच्या संतापातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पेटले आहे. कोळसा खान कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चाच्या वतीने रोशन हरबडे यांच्या नेतृत्वात २० एप्रिलपासून सुरू झालेले हे आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे.
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) अंतर्गत माती उत्खननाची कंत्राटी कामे देताना संबंधित कंपन्या सर्रास परप्रांतीय कामगारांना प्राधान्य देत असल्याचा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. “स्थानिक शेतमजूर, बेरोजगार आणि अनुभवी युवकांना मुद्दाम डावलले जाते,” असा संतप्त आरोप करण्यात आला आहे.
यापूर्वीही या प्रश्नावर अनेक आंदोलने, निवेदने आणि चंद्रपूर ते नागपूर पदयात्रा काढूनही प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच “आता आरपारची लढाई” म्हणत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे रोशन हरबडे यांनी स्पष्ट केले. “हक्काचा रोजगार मिळाल्याशिवाय माघार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, हवामान खात्याने उष्णतेची लाट जाहीर केली असून चंद्रपुरात तापमान ४३ अंशांवर पोहोचले आहे. अशा जीवघेण्या उकाड्यात आंदोलन सुरू असतानाही प्रशासन आणि वेकोलीकडून कोणतीही ठोस हालचाल दिसत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक युवक रस्त्यावर उतरले असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका होत आहे. आता हा संघर्ष नेमका कुठपर्यंत जातो आणि प्रशासन झोपेतून कधी जागे होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









