Home चंद्रपूर जिल्ह्यातील एकही बालक उपचारापासून वंचित राहू नये, हाच आमचा संकल्प — आ....

जिल्ह्यातील एकही बालक उपचारापासून वंचित राहू नये, हाच आमचा संकल्प — आ. किशोर जोरगेवार

0
26

जिल्ह्यातील एकही बालक उपचारापासून वंचित राहू नये, हाच आमचा संकल्प — आ. किशोर जोरगेवार

आ. जोरगेवार यांच्या संकल्पनेतून बालकांसाठी आरोग्य शिबिर संपन्न; २७ बालकांवर मुंबईत होणार शस्त्रक्रिया

चंद्रपूर : प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांचे मूल हेच सर्वस्व असते. त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हसू टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे हीच खरी समाजसेवा आहे. आपल्या जिल्ह्यातील एकही बालक उपचारापासून वंचित राहू नये, हा आमचा ठाम संकल्प आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने तसेच किम्स रुग्णालय, मुंबई आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्या सहकार्याने २० एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात १८ वर्षांखालील बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी, 2D इको आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, किम्स रुग्णालयाचे डॉ. एल. श्रीनिवास, डॉ. नमिता बॅनर्जी, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहुले, सुमित बेले, कौसर खान, भाग्यश्री हांडे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक बालक निरोगी राहावे, हीच आमची खरी इच्छा आणि जबाबदारी आहे. अनेक वेळा आर्थिक अडचणींमुळे गरजू कुटुंबांना आपल्या मुलांच्या उपचारांसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. अशा वेळी हा उपक्रम त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे.
ते पुढे म्हणाले की, या शिबिराच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून लहानग्यांची सखोल तपासणी होत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. केवळ तपासणीच नव्हे, तर गरज असलेल्या बालकांना पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी योग्य मार्गदर्शनही दिले जात आहे. आतापर्यंतच्या या उपक्रमाचा आढावा घेत त्यांनी सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून आजवर २२८ हून अधिक बालकांवर नामांकित रुग्णालयांमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अनेक महागड्या शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात आल्या आहेत. हे कार्य केवळ आरोग्य सेवा नाही, तर अनेक कुटुंबांना नवे जीवन देणारे आहे.

२७ बालकांवर मुंबईत निशुल्क शस्त्रक्रिया

मागील शिबिरात शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या सर्व बालकांची या शिबिरात पुनर्तपासणी करण्यात आली असून ती सर्व बालके पूर्णतः निरोगी असल्याचे निष्पन्न झाले. तर या शिबिरात तपासणीसाठी आलेल्या २१० बालकांपैकी २७ बालकांच्या हृदयात छिद्र आढळून आले आहे. या सर्व बालकांवर मुंबई येथील किम्स रुग्णालयात निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रवास, निवास आणि भोजनाची संपूर्ण व्यवस्था आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

मुंबईहून 2D इको मशीनद्वारे तपासणी

चंद्रपूरमध्ये 2D इको मशीन उपलब्ध नसल्यामुळे बालकांच्या हृदयातील दोषांचे अचूक निदान करणे कठीण होते. त्यामुळे या शिबिरासाठी मुंबईहून विशेष 2D इको मशीन आणण्यात आले होते. या अत्याधुनिक यंत्राद्वारे बालकांची अचूक तपासणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!