Home चंद्रपूर चंद्रपूर वनविभागातील वनमजुरांच्या थकीत वेतनाचा मार्ग मोकळा!

चंद्रपूर वनविभागातील वनमजुरांच्या थकीत वेतनाचा मार्ग मोकळा!

0
74

चंद्रपूर वनविभागातील वनमजुरांच्या थकीत वेतनाचा मार्ग मोकळा!

आमदार देवराव भोंगळे यांनी वेधले लक्ष ; वनमंत्र्यांनी दिले तातडीने देयके वितरित करण्याचे आदेश

चंद्रपूर वनविभागांतर्गत कार्यरत असलेल्या शेकडो कंत्राटी वनमजुरांचा मागील चार महिन्यांपासून रखडलेल्या वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांनी याप्रश्नी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गंभीरतेने दखल घेत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या याच प्रयत्नांना यश आले असून राज्याच्या वनमंत्र्यांनी थकीत मजुरी तातडीने वितरित करण्याचे आदेश दिल्याने वनमजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चंद्रपूर वनविभागात संगणक चालक, वाहन चालक, रोपवन मजूर, चौकीदार, बिट मदतनीस आणि वनविश्रामगृह मजूर अशा विविध पदांवर कंत्राटी कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. मात्र, ऑक्टोबर २०२५ पासून त्यांना मजुरी मिळाली नाही. थकीत वेतनामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या हक्काच्या मानधनासाठी या कर्मचाऱ्यांनी १६ फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. वनसंवर्धन, वन्यजीव संघर्ष निवारण आणि वनसंरक्षणासारखी महत्त्वाची कामे या आंदोलनामुळे प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या गंभीर समस्येची दखल घेत आमदार देवराव भोंगळे यांनी थेट शासनाकडे धाव घेतली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी सभागृहात उपप्रश्न उपस्थित करून शासनाचे याकडे लक्ष वेधले. वनमजुरांवरील आर्थिक संकट आणि वनसंरक्षण व्यवस्थेवर होणारा प्रतिकूल परिणाम त्यांनी प्रभावीपणे मांडला. ‘वेतन देयक संनियंत्रण प्रणाली’ (Wage Bill Monitoring System) अंतर्गत निधी उपलब्ध नसल्याने ही कोंडी निर्माण झाली होती. आमदार भोंगळे यांनी वन्यजीव उपशमन योजना तसेच अधिवास विकासाच्या २% व ४% निधीतून ६६६.१० लक्ष रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली.

आमदार भोंगळे यांच्या पत्राची आणि सभागृहातील मांडणीची तात्काळ दखल घेत राज्याचे वनमंत्री ना. गणेशजी नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कालच या संदर्भात जिल्ह्यातील वनमजुरांची थकीत देयके वितरित करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याचे मंत्र्यांनी सभागृहात जाहीर केले.

आमदार देवराव भोंगळे यांच्या या यशस्वी मध्यस्थीमुळे वनमजुरांचे आंदोलन आता मागे घेतले जाण्याची शक्यता असून, विभागाचे कामकाज पुन्हा सुरळीत होणार आहे. सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल वनमजुरांनी आमदार भोंगळे यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!