लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे घुग्घुस येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘नारी शक्ती’चा सन्मान ; विविध स्पर्धांमधून महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
घुग्घुस : लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. दि. १२ मार्च २०२६ रोजी घुग्घुस येथील त्रिमूर्ती सभागृहात आयोजित या भव्य कार्यक्रमात परिसरातील विविध गावांमधून आलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून पंचायत समिती चंद्रपूरच्या गटविकास अधिकारी सौ. संगीता भांगरे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मनीषा पुरी तसेच जी. डी. गोयंका शाळेच्या प्राचार्या जेसी रॉय यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. संगीता भांगरे यांनी महिलांना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की, “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती समाजाचा उद्धार करते.” आजची महिला केवळ चूल आणि मुलांपुरती मर्यादित न राहता समाज घडविण्यासोबतच राष्ट्रनिर्मितीतही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, प्रशासन तसेच सामाजिक क्षेत्रात महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली असून महिला सक्षमीकरण ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी सामूहिक नृत्य, एकल नृत्य, पथनाट्य, वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची आदी विविध सांस्कृतिक व मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेत आपली कला, कौशल्य आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले. स्पर्धांमधील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्या महिलांचा सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
पारितोषिक वितरण सोहळ्यात लॉयड्स मेटल्सचे युनिट हेड वाय. जी. एस. प्रसाद, वरिष्ठ व्यवस्थापक प्रशांत पुरी तसेच विकास वर्मा यांच्या हस्ते विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी वाय. जी. एस. प्रसाद यांनी उपस्थित महिलांना संबोधित करताना त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे भविष्यातही विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रशांत पुरी यांनी घुग्घुस, म्हातारदेवी, बेलसनी, शेणगाव, मुरसा, नकोडा, उसगाव, वढा, पांढरकवडा, पिंपरी, अंतुर्ला व धानोरा या परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांचे विशेष आभार मानले. भविष्यात महिलांसाठी यापेक्षाही अधिक प्रभावी, उपयुक्त आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्या पाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील सुमारे १६५० महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.








