Home चंद्रपूर म्हाडा गृहनिर्माण योजनेतील घरावर अनधिकृत ताबा प्रकरण – संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशीची मागणी

म्हाडा गृहनिर्माण योजनेतील घरावर अनधिकृत ताबा प्रकरण – संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशीची मागणी

0
62

म्हाडा गृहनिर्माण योजनेतील घरावर अनधिकृत ताबा प्रकरण – संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशीची मागणी

अमोल राऊत 

संपादक 

 

चंद्रपूर : म्हाडा अंतर्गत 415-96 गृहनिर्माण योजनेतील विंग C मधील घर क्रमांक 102 (म्हाडा कॉलनी,दाताळा, चंद्रपूर) या घराबाबत गंभीर अनियमितता व भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात अर्जदाराने दिनांक 23/12/2025 रोजी सदर घर अधिकृतरित्या बुक केले असून अर्ज क्रमांक 9850000291 अंतर्गत सर्व आर्थिक व प्रशासकीय पूर्तता पूर्ण केली आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष पाहणीदरम्यान सदर घरामध्ये गेल्या सुमारे दोन वर्षांपासून इतर कुटुंब अनधिकृतरित्या वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर बाबत संबंधित म्हाडा अधिकाऱ्यांना वारंवार लेखी व तोंडी कळवूनही कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही. उलट अनधिकृत ताबा कायम राहिल्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग किंवा संगनमत असल्याची गंभीर शंका व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता तेथील अधिकाऱ्यांनी हे प्रकरण सिव्हिल स्वरूपाचे असल्याचे सांगून गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केल्याचेही अर्जदाराने म्हटले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन संबंधित म्हाडा अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशी करून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 420, 166, 217, 218, 219 व 120(B) अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे.

सार्वजनिक गृहनिर्माण योजनेत अशा प्रकारचे अनियमितता व भ्रष्टाचाराचे प्रकार घडत असल्यास सर्वसामान्य नागरिकांचा शासनावरील विश्वास कमी होण्याची शक्यता असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!