कुनघाडा रै फाट्यावर भीषण अपघात : सुरजागडच्या ट्रकने तीन वाहनांना दिली धडक ६ जखमी
चामोर्शी, सुखसागर झाडे :- गडचिरोली- चामोर्शी महामार्गावरील कुनघाडा रै फाट्यावर अगदी बस थांब्यासमोर सुरजागड लोह खनिज प्रकल्पावर कार्यरत असलेल्या ट्रकने जागेवर उभ्या असलेल्या तीन वाहनांना जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ऑटो वाहनातील ६ प्रवासी जखमी झाले आहेत. एक दुचाकी चकनाचूर झाली असून बाकी वाहनांची तुटफुट झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार एम एच ३३, जे ००९७ क्रमांकाची दुचाकी, एम एच ३४, बी एच ३४३० क्रमांकाचा प्रवासी भरलेला ऑटो व एम एच ३३, टी ४९१६ क्रमांकाची पीकअप नियमानुसार आपल्या बाजूस उभ्या होत्या. गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जाणाऱ्या सुरजागड लोहखनिजाच्या एम एच ३४, बी झेड २५०४ क्रमांकाच्या खाली ट्रकने विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या तीनही वाहनांना जोराची धडक दिली. घडलेल्या अपघातात ऑटोमधील चंद्रकला सुधाकर गुरपल्ले कढोली, सुरेश वागू इजमानकर कढोली, गया ललित इजमानकर कढोली, प्रेमीला देवराव वाकुडकर सालधारी, प्रमोद बंडु झाडे कुरुड चक, शशिकला शामराव वाकुडकर सालधारी असे ६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक चालकास जागीच ताब्यात घेण्यात आले आहे.
अपघात झाल्याचे माहिती होताच जवळच्या नागरिकांनी तातडीने धाव घेऊन प्राथमिक मदत केली. सर्व जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी कुनघाडा रै येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले.
कुनघाडा रै बस थांब्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकात चिंतेचे वातावरण पसरले आहे.









