तालुका महसूल अधिकारी साहेब, ऐकावे ते नवलच..! नाही का..?
रात्रपाळीत चालतो तो खेळ रेती उत्खननाचा नव्हे तर कसला…

चंद्रपूर, ८ जाने. :- गोंडपिपरी व राजुरा तालुक्यात रेती तस्करांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मात्र वरचष्मा घातलेल्या तालुका महसूल अधिकाऱ्यांना यावर आवर घालता आला नाही, यामुळे जनआक्रोश वाढताना दिसून येत आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी येथील वर्धा नदी घाटावर रोज रात्री १० वाजेनंतर पोकलांड व जेसीबीच्या साहाय्याने रेतीची वारेमाप उत्खनन केल्या जात असताना तालुका महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांची डोळेझाक का होत आहे..? हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. लिलाव घाटातील ठरवून दिलेल्या ब्रास पेक्षा जास्त रेतीची उचल नियमाला सर्रास बगल देऊन केली जात असताना महसूल विभागाने या तस्करांपुढे लोटांगण घातले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आर्थिक मोह :- प्रशासकीय सेवेत येऊन जनकल्याण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणारे प्रत्यक्ष शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर जनकल्याण बाजूला सारून अवैध व्यावसायिकांनी घातलेली पैशाची भुरळ कर्तव्याचा विसर पाडताना दिसून येत असल्याची खंत जनसामान्य नागरिक व्यक्त करताना दिसून येत आहेत. आर्थिक मोहापायी नदी – नाल्यांचे अर्थातच निसर्गाला खाईत लोटण्याचा विडा महसूल विभागाने घेतला आहे का..? असे चित्र दिसून येत आहे.
जनप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते दबाव..? :- स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते व जन प्रतिनिधी यांनी आपले खिसे भरण्यासाठी, अल्पावधीत अमाप पैसा कमविण्याची नादात आपला मोर्चा रेती तस्करीकडे वळविला आहे का..? वर्धा नदी घाटावर सामाजिक कार्यकर्ता व लोक प्रतिनिधी यांची सांगड घालून रेती उत्खनन केले जात असल्याने त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याची चर्चा स्थानिक जनमानसात जोरात सुरू असल्याचे दिसून येते.
रस्त्यांचे वाजले तीन – तेरा :- आर्वी येथून तेलंगणात कविटपेठ, चिंचोली मार्गे मोठे हायवा व ट्रक साहाय्याने रेती ची वाहतूक केली जात असल्याने या ग्रामीण रस्त्याची पुरती वाट लागली असून तीन तेरा वाजले आहेत. आणि याकडे स्थानिक पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाची होणारी डोळेझाक संशयास्पद दिसून येत आहे. सामान्य नागरिकांना कायदा सांगणारी व कार्यवाहीचा बडगा उगारणारी प्रशासन व्यवस्था याकामी मौन व्रत धारण करून असल्याने संपूर्ण प्रशासन व्यवस्थाच कोलमडली असल्याचे खुले चित्र आहे.
याप्रमाणेच राजुरा तालुक्यात सर्रास पणे रेतीची चोरटी वाहतूक सुरू असून संपूर्ण महसूल व्यवस्था तस्करांच्या दावणीला बांधली गेली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भरदिवसा होणारी रेती चोरी महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर उघड चपराक आहे. यातून महसूल विभागाचा नाकर्तेपणा व वांझोटेपणा उघड होताना दिसून येत आहे. एरवी दिवसा नदी नाल्यांची मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून नदी पात्रांची चौकशी केली जाते तर रात्रपाळीत स्थानिक चोरट्यांकडून रेती चोरीचा धुमाकूळ घातला जातो. यावरून हे सर्व केवळ दिखाव्यासाठी केले जात असून निसर्गाशी होत असलेली प्रताडणा निदर्शनास येत आहे. या सर्व बाबीची गंभीर दखल घेऊन महसूल विभाग भानावर येऊन आपल्या कर्तव्याला जागेल का..? हा प्रश्न सुजाण नागरिक, पर्यावरण प्रेमी यांना पडला आहे.








