लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन अंतर्गत हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिराचे यशस्वी आयोजन
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या आरोग्यास प्राधान्य देत हिमोग्लोबिन (HB) तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सहाय्यक महाप्रबंधक श्रीमती विद्या पाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या आरोग्य शिबिरामध्ये उसगाव, म्हातारदेवी, नकोडा, पांढरकवडा, वढा, शेणगाव, धानोरा, पिंपरी, बेलसणी व मुरसा या परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सचिव तसेच मोठ्या संख्येने महिला व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढत चाललेली रक्तक्षयाची (अॅनिमिया) समस्या लक्षात घेऊन त्याबाबत तपासणी, प्रतिबंध व जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
या शिबिरामध्ये डॉक्टर पायल कोंडेकर, डॉक्टर स्नेहा बक्षी व डॉक्टर मानसी पेंडकांडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत एकूण ११०६ महिला व किशोरवयीन मुलींनी तपासणीचा लाभ घेतला. तपासणीदरम्यान उपस्थित महिलांची HB पातळी तपासून त्यांना वैयक्तिक आरोग्य सल्ला देण्यात आला.
तसेच रक्तक्षयाची कारणे, त्याची लक्षणे, संभाव्य धोके, प्रतिबंधात्मक उपाय, संतुलित व पोषक आहाराचे महत्त्व, लोहयुक्त आहाराचा समावेश, नियमित आरोग्य तपासणीची गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीनंतर गरज असलेल्या महिलांना मोफत औषधोपचार व पूरक औषधे देखील देण्यात आली.
जनजागृती सत्रामध्ये विशेषतः किशोरवयीन मुलींना उद्देशून मार्गदर्शन करण्यात आले. वाढीच्या वयातील मुलींनी आहाराबाबत घ्यावयाची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्यदायी जीवनशैली, मासिक पाळी विषयक आरोग्य, तसेच भविष्यात उद्भवू शकणाऱ्या आरोग्य समस्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत डॉक्टरांनी सुलभ व समजण्यासारख्या भाषेत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल उपस्थित ग्रामस्थ, महिला व लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. अशा प्रकारचे आरोग्यविषयक शिबिर नियमितपणे आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.








