डाक विभागा तर्फे शंकर निवलकर यांना राष्ट्रीय पुरस्कार
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते सन्मान
नांदा फाटा :- उत्कृष्ट सेवा, प्रामाणिक कार्यशैली आणि जनसंपर्कातील बांधिलकी यासाठी भारतीय डाक विभागात ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत असलेले शंकर निवलकर यांना केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा मानाचा पुरस्कार केंद्रीय संचार आणि पूर्वोत्तर विकास मंत्री मा. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते वडोदरा येथे झालेल्या भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात देशभरातील निवडक डाक अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील पाच अधिकाऱ्यांना या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यामध्ये शंकर निवलकर यांचा समावेश असून हा चंद्रपूरसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
निवलकर यांनी डाक सेवेत तंत्रज्ञानाधारित सुधारणा, जनसंपर्क वृद्धी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांचा राष्ट्रीय सन्मानाने गौरव केला.
शंकर निवलकर हे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा गावचे रहिवासी असून, त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदा गावातील नागरिक, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




