253 वा क्रमांक गाठत किशोर दुधगोंडे PSI; येल्लापुरात जल्लोष, गावकऱ्यांकडून भव्य सत्कार
615 जागांमध्ये स्थान, युवकांसाठी प्रेरणादायी प्रवास

जिवती : अपयशावर मात करत जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर येल्लापुर येथील किशोर माधव दुधगोडे यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) भरतीत 253 वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. 615 जागांमध्ये स्थान मिळवत त्यांनी कुटुंबाचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
पहिल्या प्रयत्नात अंतिम मेरिटमध्ये थोडक्यात स्थान हुकले तरीही न डगमगता त्यांनी नव्या जोमाने तयारी सुरू ठेवली. नियोजनबद्ध अभ्यास, नियमित सराव आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. 2023 मधील पूर्व परीक्षा, 2024 मधील मुख्य परीक्षा यशस्वीरीत्या पार केल्यानंतर एप्रिल 2026 मधील शारीरिक चाचणीतही त्यांनी उत्तम कामगिरी नोंदवत अंतिम यादीत स्थान मिळवले.

या यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा उत्साहात जंगी सत्कार करण्यात आला. भाष्कर सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास पोलीस पाटील उद्धवकुमार जोंधळे, दिलीप जिवणे, माधव दुधगोडे, संभाजी ढगे, शिवदास शिनगारे, किर्लोस गायकवाड, गणपत सोनकांबळे, संतोष हरगिले, हरिश्चंद्र सरोदे, आत्तम वाघमारे, रावसाहेब बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी युवक मंडळी व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन किशोर दुधगोंडे यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात किशोर दुधगोंडे यांनी यशामागील संघर्ष, सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीचा प्रवास उलगडत उपस्थित युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले. या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, किशोर दुधगोडे हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुद्धोधन निखाडे, सतीश क्षीरसागर, नितीन सोनकांबळे, कल्याण सरोदे, संभाजी हरगिले, ज्ञानपाल सरोदे, विजय बनसोडे, अभिनंद सोनकांबळे यांचेसह नवयुवक मंडळीने अथक परिश्रम घेतले.



