Home चंद्रपूर गोंडपिपरी गणेशपिपरीत वाघाचा हल्ला; शेतात काम करणाऱ्या महिलेला जागीच मृत्यू — आठ दिवसांत...

गणेशपिपरीत वाघाचा हल्ला; शेतात काम करणाऱ्या महिलेला जागीच मृत्यू — आठ दिवसांत दुसरा बळी, परिसरात भीतीचे सावट

0
247

गणेशपिपरीत वाघाचा हल्ला; शेतात काम करणाऱ्या महिलेला जागीच मृत्यू — आठ दिवसांत दुसरा बळी, परिसरात भीतीचे सावट

गोंडपिपरी (प्रतिनिधी / अमोल राऊत)

गोंडपिपरी तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याने हाहाकार माजला आहे. तालुक्यातील गणेशपिपरी गावातील अल्का महादेव पेंदोर (वय 45) या रविवारी (दि. 27) सकाळी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, सायंकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. गावकऱ्यांनी शोध घेतला असता त्यांच्या शेतात चिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.

गेल्या आठ दिवसांत वाघाच्या हल्ल्यातील हा दुसरा मृत्यू असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. याआधीच चेकपिपरी गावातील शेतकरी भाऊजी पाल यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

विहीरगाव, वटराणा, गणेशपिपरी, चेकपिपरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर वाढला असून, अनेक जनावरांचे बळी घेतले गेले आहेत. वनविभागाकडून गस्त वाढविण्यात आली असली तरी वाघाला पकडण्यात अद्याप अपयश आले आहे.

वाघाच्या दहशतीमुळे मजूर मिळत नसल्याने अल्का पेंदोर या एकट्याच शेतात गेल्या होत्या. मात्र, दुर्दैवाने त्या परतल्या नाहीत. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र संतप्त ग्रामस्थांनी “जोपर्यंत वाघाला जेरबंद केले जात नाही आणि मृतक कुटुंबास सन्मानजनक मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही,” असा इशारा दिला.

दरम्यान, आमदार देवराव भोंगळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असून, वाघाला तातडीने जेरबंद करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

गोंडपिपरी तालुक्यात सलग दोन वाघहल्ल्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, नागरिकांनी वनविभागाने ठोस कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!