गोवंशीय जनावर तस्करीला अभयदान कोणाचे..?
कविटपेठ गावालगत जंगलातून व गोंडपिंपरी तालुक्यातील सोनापुर येथून तेलंगणात तस्करी
राजुरा/गोंडपिपरी :- मागील अनेक दिवसांपासून बेदरकारपणे गोवंशीय जनावरांची कविटपेठ गावालगत जंगलातून तेलंगणा राज्यात कोष्टाळा लक्कडकोट भोयेगाव मार्गे तस्करी सुरू आहे. तसेच गोंडपिपरी तालुक्यातील सोनापुर येथून पिकअप मधून पोडसा मार्गे सर्रासपणे गोवंशीय जनावरांची कत्तलिकरिता निर्दयीपणे वाहतूक करून तस्करी केल्या जात आहे. मात्र याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाची होणारी डोळेझाक आश्चर्यजनक असल्याचा आरोप गोप्रेमी, पशुपालक, पर्यावरणप्रेमी कडून करण्यात येत आहे.
उप पोलीस ठाणे लाठी व पोलीस ठाणे विरूर स्टेशन हद्दीतून जनावरांना मजुरांकडून लाठी काठीने मारझोड करत पायी नेण्यात येते. या मजुरांना ७०० रुपये मजुरी दिली जाते. सदर जनावरे कविटपेठ चिंचोली येथील जंगलात एकत्र करून कोष्टाळा लक्कडकोट मार्गे तेलंगणात तर गोंडपिपरी तालुक्यातील सोनापुर येथे जनावरे एकत्र करून पोडसा सिरपुर मार्गे बिनदिक्कतपणे वाहतूक केली जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
विरुर स्टेशन पोलीस ठाणे हद्दीतील अट्टल जनावर तस्कर व सोबतीला तीन ते चार तस्कर यांच्याकडून हा व्यवसाय केला जात असताना पोलीस प्रशासनाला याची माहिती नसल्याचे महाआश्चर्य आहे. लक्ष्मीप्रसादाने लाठी व विरूर पोलीस ठाणे सदर जनावर तस्करावर विशेष मेहरबान आहे का..? असा संतप्त सवाल परिसरातील सुजाण नागरिकांना पडला आहे. मुक्या जनावरांची या निर्दयी तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात येऊन कायमचा गोवंश जनावर तस्करीला लगाम लावावा अशी मागणी केली जात आहे.








