Home चंद्रपूर प्रशासकीय भवनात लाचलुचपत प्रकरण उघडकीस

प्रशासकीय भवनात लाचलुचपत प्रकरण उघडकीस

0
579

प्रशासकीय भवनात लाचलुचपत प्रकरण उघडकीस

सहायक महसुल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांना ३० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

 

चंद्रपूर, दि. २८ सप्टेंबर : जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चंद्रपूर पथकाने आज प्रशासकीय भवन येथे ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

तक्रारदाराच्या मुलीची प्रकल्पग्रस्त राखीव जागेतून कनिष्ठ अभियंता या पदासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत निवड झाल्यानंतर, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी करण्यासाठी जिल्हा पुनर्वसन कार्यालयाकडे पत्र आले होते. त्यावेळी खांडेकर यांनी एकूण २ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर तक्रारदाराने जुलै २०२५ मध्ये १ लाख रुपये दिले, तर उर्वरित ३० हजार रुपये अहवाल पाठविण्यापूर्वी देण्याची मागणी खांडेकर यांनी केली होती.

तक्रारदाराने उर्वरित रक्कम देण्यास नकार देताच त्यांनी थेट एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार आज पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता खांडेकर यांनी ३० हजार रुपयांची मागणी निश्चित केली. नंतर सापळा रचून एसीबीच्या पथकाने त्यांना कार्यालयातच लाच स्वीकारताना अटक केली. दोन वर्षा अगोदर ते पुरवठा विभाग येथे कार्यरत होते. त्यांची बदली चंद्रपूर येथे झाली होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत हिवराज नेवारे, विजेंद्र वाढई, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, राजेंद्र चौधरी, सचिन गजभिये, महेश माहुरपवार, मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, सतिश सिडाम, संदीप कौरोसे आदींचा सहभाग होता.

👉 एसीबीचे आवाहन :
कोणत्याही शासकीय कामासाठी जर अधिकारी-कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणताही एजंट लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

नागपूर कार्यालय : ०७१२-२५६१५२०

चंद्रपूर कार्यालय : पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले / पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे / पोलीस निरीक्षक सचिन धर्मजयार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!