सीमावर्ती भागात बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर कारवाईची मागणी
राजुरा प्रतिनिधी : राजुरा विधानसभेतील सीमावर्ती तालुके तेलंगणा राज्याच्या लगत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जुगार अड्डे फोफावत आहेत. रम्मीच्या नावाखाली “तीन पत्ते” व “कट पत्ता” सारखे जुगार खेळ सुरू असून यामुळे शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी केला आहे.
हजारे यांनी पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
कोणत्या ठिकाणी चालतोय जुगार?
राजुरा तालुक्यातील सोनुर्ली, जिवती तालुक्यातील पाटन बोरी, गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा, तसेच कोरपना तालुक्यातील गडचंदूर येथे मोठ्या प्रमाणात हे अड्डे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. दररोज १०० ते २०० फोरव्हिलर गाड्यांमधून बाहेरील जुगारी येथे येतात. या अड्ड्यांवर अवैध दारू, मांसाहारी जेवण यांचीही सोय केली जाते.
वाढते वाद आणि धोका
जुगार खेळताना पैशांच्या वादावरून अनेकदा भांडणे व मारामाऱ्या झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून सामाजिक व्यवस्था बिघडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
कायद्याचा आधार
महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 नुसार, जुगार अड्डा चालविणे किंवा त्यात सहभागी होणे हा दंडनीय गुन्हा आहे. या अधिनियमानुसार पोलिसांना तातडीने छापे टाकून संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत.
निवेदन आणि उच्चस्तरीय तक्रार
या सर्व जुगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करून बंद करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार पोहोचविण्यात आली आहे.








